13 कोटींचा गंडा घालणाऱ्या उत्तरप्रदेशातील ठगास अटक

शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेशातील एका ठगाने सुमारे 13 कोटींचा गंडा घातला आहे. कराडसह सातारा,  अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील  81 लोकांचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित उत्तरप्रदेशातील ठगास अटक केली आहे.

13 कोटींचा गंडा घालणाऱ्या उत्तरप्रदेशातील ठगास अटक

13 कोटींचा गंडा घालणाऱ्या उत्तरप्रदेशातील ठगास अटक 

शेअर मार्केट गुंतवणूक : जादा टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष, 81 लोकांना घातला गंडा 

कराड/प्रतिनिधी :
          शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेशातील एका ठगाने  सुमारे 13 कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. कराडसह सातारा,  अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील  81 लोकांचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित उत्तरप्रदेशातील ठगास अटक केली आहे. 
         ह्दया रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, रूम नं.1109, 10 वा माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश असे फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
        याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुप्ता हा प्रॉफिट मार्ट, पुणे येथे शेअर मार्केटमध्ये नोकरीस होता. तेथे कंपनीत गुंतवणूक करणार्‍या वेगवेगळ्या लोकांशी झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन व त्यांचा विश्वास संपादन करून कंपनीपेक्षा जादा फायदा व हमखास प्रति महिना उत्पन्न मिळवण्याचे आमिष  दाखविले. त्याबाबत कागदोपत्री करार करून हमी देत त्याने लोकांना 5 ते 6  महिने प्रति महिना पैश्यांचा परतावाही दिला. त्यानंतर लोकांचा विश्‍वास संपादन झाल्याचे लक्षात येताच गुप्ताने लोकांकडे मोठ्या रक्कमेची मागणी केली. 
            त्यामध्ये कराड येथील अमित आंबेकर व त्याचे मित्र सचिन वाघमारे यांनाही गंडा घातला आहे. या दोघांकडून त्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर 19  लाख 87 हजार 500 रूपये मागवून घेत पळ काढला होता. याप्रकरणी कराड पोलिसांनी गुप्ता याला 27 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथून अटक केली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुप्ता याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
          त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे  पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केला. त्यामध्ये गुप्ता याने कराडसह सातारा, अहमदनगर, बीड व पुणे जिल्ह्यातील 81 लोकांची सुमारे 13 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामधील बीड येथील एसटी चालकाने कर्ज काढून पैसे गुंतवले होते. तर पुणे येथील एकाने वडिलांचे निवृत्ती नंतरचे फंडाचे पैसे गुंतवले होते.  
          गुप्ता याने लोकांकडून सदर रक्कम प्राप्त झाल्यानंतर सर्व रक्कम घेऊन पोबारा केला. तसेच त्याने या पैशातून बी. एम. डब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या,  फाईव्हस्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, परदेश दौरे, विमान प्रवास, महागडे कपडे, घड्याळे अशा प्रकारे लोकांकडून मिळवलेल्या पैसे खर्च केले. 
        सदर गुन्ह्यात जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.