आगशिवगडावर निसर्गसेवक मावळ्यांची हरित शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी निसर्ग ग्रुप, कराडच्या निसर्गसेवक मावळ्यांनी आगाशिवाच्या पायथ्यापासून गडावरील वृक्षराज वडाच्या झाडापर्यंत भगवा ध्वज व झाडांसाठी पाणी घेऊन निसर्ग मिरवणूक काढली. दरम्यान, गतवर्षी शिवजयंतीदिनीच गड पायथ्याशी लावलेल्या 21 झाडांचा वाढदिवस साजरा करून निसर्गसेवकांनी हरित व निसर्गवर्धक शिवजयंती साजरी करीत आपल्या जाणत्या राजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

आगशिवगडावर निसर्गसेवक मावळ्यांची हरित शिवजयंती
जखिणवाडी : आगाशिवगडावर हरित व निसर्गवर्धक शिवजयंती साजरी करताना निसर्ग ग्रुप, कराडचे निसर्गसेवक.
आगशिवगडावर निसर्गसेवक मावळ्यांची हरित शिवजयंती

आगशिवगडावर निसर्गसेवक मावळ्यांची हरित शिवजयंती

जाणत्या राजाला निसर्ग ग्रुपची अनोखी मानवंदना : पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंत निसर्ग मिरवणूक 

कराड/प्रतिनिधी : 

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राज्यभरात भगवी लाट उसळते. भव्य मिरवणुका, ढोल-ताशांच्या गजरात जयजयकार करणाऱ्या शिवप्रेमी, मावळ्यांमध्ये त्यादिवशी भवानीच संचारते जणू. परंतु, हे शिवप्रेम केवळ एकदोन दिवसांपुरते न दाखवता शिवरायांचे आचार, विचार आणि त्यांनी अनेकविध प्रसंगांमधून दिलेले लाखमोलाचे संदेश नित्य जोपासणाऱ्या निसर्गसेवक मावळ्यांनी आगशिवगडावर हरित व निसर्गवर्धक शिवजयंती साजरी केली.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी निसर्ग ग्रुप, कराडच्या निसर्गसेवकांनी आगाशिव पायथ्यापासून गडावरील वृक्षराज वडाच्या झाडापर्यंत भगवा ध्वज व झाडांसाठी पाणी घेऊन निसर्ग मिरवणूक काढली. दरम्यान, गतवर्षी शिवजयंतीदिनीच गड पायथ्याशी लावलेल्या 21 झाडांचा वाढदिवस साजरा करून निसर्गसेवकांनी हरित शिवजयंती साजरी करीत आपल्या जाणत्या राजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

    महाराजांचे वृक्षांविषयीचे विचार त्यांनी सांगितलेल्या आज्ञापत्रामधून आपल्या लक्षात येते. स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्य विस्तार आणि स्वराज्य रक्षणासाठी झुंझार मावळ्यांसह सह्याद्रीचे निर्भीड अरण्य अन् दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध असलेल्या निसर्गाने शिवछत्रपतींना मोलाचे सहकार्य केले. परंतु, अलीकडच्या काळात प्रगती आणि विकास नावाच्या गोंडस शब्दांखाली हेच स्वराज्य बेसुमार वृक्षतोडीमुळे उघडे, बोडखे झाले आहे. अशाच उघड्या, बोडख्या झालेल्या आगाशिवगडावर पुन्हा वृक्षरूपी हिरवा मुकुट चढविण्यासाठी निसर्ग ग्रुप, कराडचे निसर्गसेवक २०१७ पासून प्रयत्नशील आहोत. त्यांनी आत्तापर्यंत गडमाथा ते पायथ्यापर्यंत तब्बल १ हजारापेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व जतन केले आहे.

    यातीलच एक मोहीमेचा भाग म्हणून निसर्ग ग्रुपच्या निसर्गसेवकांनी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत शिवजयंतीनिमित्त गडपायथ्यापासून माथ्यावरील वडाच्या झाडापर्यंत भगवा ध्वज व झाडांसाठी पाणी घेऊन निसर्ग मिरवणूक काढली. तसेच गडावरील वडाच्या झाडावर भगवा ध्वज फडकवून शिवरायांना अनोखीही मानवंदना दिली. याप्रसंगी निसर्गसेवक मावळ्यांनी शिवगर्जनांनी अक्षरशः आगाशिवाचा आसमंत दणाणून टाकला. यामध्ये सहभागी बाल निसर्गसेवक मावळ्यांचा उत्साह लक्षवेधी ठरला.

    दरम्यान, आगाशिवाच्या पायथ्याशी गतवर्षी शिवजयंतीदिनीच लावलेल्या २१ झाडांचा बाल निसर्गसेवकांनी कलिंगड कापून पहिला वाढदिवस साजरा करीत हरित निसर्गवर्धक व समृद्ध शिवजयंती साजरी केली. तसेच प्रत्येक निसर्वसेवकाने सोबत आणलेले पाणी सर्व झाडांना देऊन त्यांची तृणा भागवत पर्यटकांनी गडावर टाकलेल्या बिस्लरीच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आणि अन्य कचरा गोळा करून गड व पायथा परिसराचीही त्यांनी स्वच्छता केली.

 

या निसर्वसेवेत इरा तवटे, अंशिका चावडीमनी, ओमकार गुरव, अमेय शिर्के या निसर्गसेवक बाल मावळ्यांसह तेजु थोरात, शशिकला शिर्के, शारदा चावडीमनी, सुनेत्रा पाटील, सुरेखा जाधव, दत्तात्रय चावडीमनी, चेतन जाणवेकर, सुमित जाधव, सुरेश शिर्के, श्रीपाद जोशी, आशुतोष बडवे, अजिंक्य पाटील, सोहन काळुगडे, रोहन काळुगडे, जीवन कावरे, मनोहर पवार, संदीप पाटील, अभिजित जाधव, निलेश तवटे आणि दीपक रायबागी हे सहभागी झाले होते. 

 

निसर्गसेवकांनी २०१७ पासून गड व पायथा परिसरात वृक्षारोपणास सुरुवात, गड पठारावर लावलेल्या ३०० झाडांचा ४ था वाढदिवस, निसर्ग ग्रुपने आगाशिव व पायथा परिसरात फुलवलेल्या वनराईचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी झाडांभोवती 10 फुटाच्या वणवा संरक्षक पट्याची निर्मिती, मलकापूर नगरपालिका परिसरात देशी झाडांचे रोपण, गडमाथा ते पायथ्यापर्यंत तब्बल १ हजारापेक्षा जास्त झाडांची लागवड, पक्षितीर्थांची निर्मिती, गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गडावर जास्वंदीचे रोपण आदी. सेवा केली असून नित्य निसर्गसेवाही  अखंडितपणे सुरु आहे.