आ.आनंदराव पाटील यांचे पुत्र व पुतणे यांचा भाजपात प्रवेश

आ.आनंदराव पाटील यांचे पुत्र व पुतणे यांचा भाजपात प्रवेश

कराड/प्रतिनिधी :
                       विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांना धक्का देत आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव भावके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील, पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या, सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज भाजपात प्रवेश केला.
                      यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांच्या जीवावर आत्तापर्यंत राजकारण केले असे सर्वजण आज भाजपात आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर नाराज होऊन, आणि भाजपच्या विकास कार्याने प्रभावित होऊन ते आले आहेत. पक्षात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, त्यांना योग्य त्या जबाबदार्‍या दिल्या जातील, अशी ग्वाही दिली.
                     सुनील पाटील म्हणाले, गेली 40 वर्षे आमच्या कुटुंबाने काँग्रेसची निष्ठेने सेवा केली. पण गेल्या अनेक महिन्यांपासून मात्र आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाऊ लागले. या प्रवृत्तीला कंटाळून आज आम्ही आमच्या शेकडो कार्यकर्त्यासह देशातील मुख्य प्रवाह असणार्‍या भाजपमध्ये सहभागी झालो आहोत.
                      आर. टी. स्वामी म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण आम्हाला मात्र हीन भावना मिळू लागल्याने शेवटी आम्ही भाजपात सहभागी होण्याची निर्णय घेतला. येत्या निवडणुकीत आमच्या गटाची संपूर्ण ताकत अतुलबाबांच्या पाठीशी लावू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                      प्रतापसिंह पाटील म्हणाले, की गेली 40 वर्षे आमच्या कुटुंबाने निष्ठेने काँग्रेसची सेवा केली. पण गेली 2 वर्षे आम्हाला चुकीची भावना मिळू लागली. ते पुढे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचणार, तोच त्यांना अस्वस्थ वाटून अचानक भोवळ आल्याने ते स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने कार्यकर्त्यानी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या उपचाराने ते शुद्धीवर आल्यानंतर ते पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
                      दरम्यान, यावेळी त्यांच्यासमवेत विंगचे माजी सरपंच वसंतराव शिंदे, विजयनगरचे सरपंच सचिन मोहिते, उपसरपंच विश्वास पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या उंडाळे गावच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, गोवरेचे माजी उपसरपंच निसार मुल्ला, माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी, गोवरे सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, गोवरे ग्रा.पं. सदस्य गणेश जाधव, मुंढेचे उपसरपंच भीमराव जमाले, गोवरे ग्रा.प सदस्य रशीद मुल्ला, पवारवाडीचे सरपंच लक्ष्मण धोत्रे, नितीन पाटील, विकास कुंभार, अभिजित पवार, रमेश जगताप, अवधूत डुबल, सागर डुबल, अर्जून हुबाले, आशिष माने, अमोल चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन पवार, दिलीप पवार, डॉ. प्रकाश पाटील, चंद्रकांत शेवाळे, सुनिल जाधव, कुलदीप निकम, मारुती शेवाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, म्हाडा चे संचालक मोहनराव जाधव, संजय शेटे, पंकज पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.