खेळ कुणाला दैवाचा कळला

खेळ कुणाला दैवाचा कळला

८० च्या दशकात सातारा येथील चित्रा टॉकीझला प्रदर्शित झालेला 'देवता'चित्रपट आज अभिनेता रविंद्र महाजणींच्या निधनाने पुन्हा एकदा आठवणीत आला.वयाच्या ७७ व्या वर्षी पुणे येथील राहत्या घरी त्यांचे आकस्मिक निधन झाले एकेकाळी सिनेमा थिएटरच्या बाहेर दर्शकांच्या रांगा खेचनारा मराठी अभिनेता एकाकी जीवन जगत असताना अनंतात विलीन होतो याची कुणालाही दोन दिवस साधी माहितीही लागत नाही यामुळे देवता चित्रपटातील खेळ कुणाला दैवाचा कळला हे गाणे सहजच आठवणींच्या स्वरूपात स्मृती पटलावर रेंगाळू लागले.

देवता चित्रपटातील कलाकार आशा काळे, रविंद्र महाजनी, विजू खोटे, प्रकाश इनामदार, लता थत्ते, महेश कोठारे, प्रिया तेंडूलकर, राजशेखर, सुधीर बावकर, पद्मा खन्ना, सुधीर दळवी, माया जाधव, सलीम लाटकर, सुधाकर निखळ, बाबुराव माने, श्रीकांत रसाळ, दादा भोसले पार्श्वगायक :आशा भोसले, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, परेश पेवेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने या चित्रपटात जीव ओतला होता तर  काही मधुर गीते आजही नकळत ओठावर गुणगुणली जात असतात १) तुम्हासाठी केले मी सोळा शृगांर, २) खेळ कुणाला दैवाचा कळला, ३) मी शरण तुला जय अंबे माँ, ४) हा मिशीवाला पाहुणा बोका जसा, ५) दान पावलं हो बाबा दान पावलं, ६) एक दोन तीन आता वाजव रे बीन, ७) दे टाळी मला घे टाळी तुला तुझीन माझी प्रीत आगळी सांगू या जगाला ही गाणी अजरामर झालीं आहेत

'झुंज' या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे  चतुरस्त्र अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची  एक्झिट अतिशय वेदनादायी आहे.रविंद्र महाजनी हे त्यांच्या  देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे ८० च्या दशकात 'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अश्या चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे. रविंद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करताना मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ डोळ्यासमोर येतो.

अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे ३ वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. मात्र ते टॅक्सी चालवतात, असे समजल्यानंतर, त्यांच्या अनेक नातलगांनी त्यांच्याशी असलेला संपर्क कमी केला होता. पण ते जेव्हा एक अभिनेता म्हणून नावारुपाला आले, तेव्हा त्यांचे हेच नातलग पुन्हा त्यांच्या जवळ आले.

महत्वाचे म्हणजे, रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले. एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.