पालकमंत्र्यानी अकलेचे तारे तोडले -अजितदादा पवार

पालकमंत्र्यानी अकलेचे तारे तोडले -अजितदादा पवार

 

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड येथील कृष्णा, कोयना नदीकाठी संरक्षण भिंत उभारण्यासंदर्भातील प्रस्तावास आघाडी सरकारचेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे ते काम रखडले. त्यामुळे कराडला पुराचा फटका बसल्याचे वक्तव्य विजय शिवतारे यांनी काल कराडात केले होते. परंतु, त्यांनी पुराच्या संदर्भातील उपाययोजनांवर बोलण्याऐवजी  मागची उणिधुनी काढून साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अकलेचे तारे तोडल्याचा प्रत्यारोप अजित पवार यांनी येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी 9 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला. 
                           येथील नदीकाठी संपूर्ण संरक्षण भिंत उभारण्यासंदर्भाच्या प्रस्तावास आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना त्यांनी मान्यता दिली होती. मात्र, त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे ते काम पूर्ण न होता, अर्धीच भिंत उभारण्यात आली. परंतु, जर ही संपूर्ण भिंत उभी राहिली असती तर आज कराडला पुराचा एवढा फटका बसला नसता, असा आरोप कराड येथे पुराची पाहणी व पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गुरुवारी 8 रोजी आले असता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. 
                       त्याला प्रत्योत्तर देताना अजित पवार म्हणाले, त्या काळात येथील नदीकाठी संरक्षण भिंत उभारण्याच्या संदर्भात सिमेंटची भिंत उभारायची का जाळीची दगडी भिंत उभारायची याबाबत विचार चालू होता. याठिकाणी सिमेंटची भिंत उभारली तर कायमस्वरूपी येथील पुराचा धोका कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करता आल्या असत्या. मात्र, येथे जाळीची दगडी भिंत उभी केली असती तर काही कारणाने भिंतीची जाळी तुटल्यास धोका निर्माण झाला असता. महामार्गावरही जाळीच्या संरक्षण भिंतीच्या जाळ्या तुटून नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळे कराडलाही सुरक्षेच्या दृष्टीने सिमेंटची भिंत उभारावी ही त्यापाठीमागची भूमिका होती. 
                      मात्र, पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या पूरस्थितीतीबाबत, नुकसान, लोकांचे स्थलांतर, जीवितहानी, वित्तहानी, आरोग्याच्या सोइ-सुविधा आदी. विषयांवर बोलण्याऐवजी पाठीमागील उणिधुनी काढून पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. असा पालकमंत्र्यांच्या आरोपाचा समाचार घेताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यावर प्रत्यारोप केला आहे.