अन्यथा.. मुजोर दुकानदारांना आपल्या स्टाईलने उत्तर देऊ - साजिद मुल्ला

अन्यथा.. मुजोर दुकानदारांना आपल्या स्टाईलने उत्तर देऊ - साजिद मुल्ला

प्रसिद्धीपत्रकाद्वारे बळीराजाचा इशारा : रेशनिग दुकांनदारांसह अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी 

कराड/प्रतिनिधी : 
          सातारा जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार व पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांची छुपी मिलीभगत असल्यामुळेच रेशनिंग दुकानदार काळाबाजार मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे लोकांपर्यंत पुर्ण क्षमतेने धान्य पोचत नाही. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व दुकानदार आणि पुरवठा विभागातील छुपे कर्मचारी यांची चौकशी करून रेशनिंग दुकानदारांचे परवाने रद्द करावे, दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अन्यथा संघटना जिल्ह्यातील मुजोर दुकानदारांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. 
           या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या सातारा जिल्ह्यात रेशनिंगच्या गहू आणि तांदळाचे वाटप सुरू आहे. मात्र, कोरोनासारख्या महामारीतही रेशनिंग दुकानदार काळाबाजार करत आहेत. प्रत्येक तालुक्यातून लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. काही दुकानदारांवर कारवाई केल्याचे पुरवठा विभाग सांगत आहेत.
          सध्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात धान्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहित जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने कामगार तसेच सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री वारंवार जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धीर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थींची फसवणूक केली जात आहे. त्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.