भाजपच्या विकासकामांचे श्रेय माजी मुख्यमंत्र्यांनी लाटू नये

भाजपच्या विकासकामांचे श्रेय माजी मुख्यमंत्र्यांनी लाटू नये

कराड/प्रतिनिधी : 

                        कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चालवला आहे. त्यासाठी गावागावात आपणच विकासकामे केल्याचे बोगस बोर्ड लावण्यात आले आहेत. पराभव दिसू लागल्याने ते सैरभैर झाल्याने त्यांनी हे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे जी कामे केलीच नाहीत; त्यांचे खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करू नये, असा आरोप शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केला. 

                        येथील शासकीय विश्रामगृहात पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खोट्या श्रेयवादाचा निषेध करण्यासाठी सोमवारी 9 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, माजी व्हा. चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पैलवान शिवाजीराव जाधव, पैलवान धनाजीराव मोहिते, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सारिका गावडे आदींची उपस्थिती होती. 

                     थोरात म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी सरचिटणीस असताना पासून ते आतापर्यंत केंद्र व राज्य सरकार माध्यमातून, मुख्यमंत्री, चंद्रकांतदादा यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी आणला. तसेच शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विवीध विकास कामे झाली आहेत. परंतु, विधानसभेच्या  पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा नारळ फोडून, उद्घाटने करून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवला आहे. तसेच 104 गावांमध्ये त्याअर्थांचे बोगस बोर्डही लावले आहेत. मात्र, लवकरात लवकर हे बोर्ड न काढल्यास या बोगस बोर्डांचाही समाचार

घ्यावा लागेल, असा इशाराही थोरात यांनी यावेळी दिला. 

                    ते पुढे म्हणाले, चव्हाण घराण्याचा मी आदर करतो त्यांचे वडील व मातोश्रींनी चांगले काम केले आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळातील विकासकामांची ते आत्ता उद्घाटने करत आहेत. परंतु पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात तुम्ही कोणकोणती कामे केली? वांग खोऱ्यात त्यांनी एखादातरी पाझर तलाव धरला आहे का? तेही सांगावे. असा प्रश्न उपस्थित थोरात यांनी उपस्थित केला. 

                     बाबांनी आता कुठेतरी थांबून तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे. देशा व राज्यातील काँग्रेस सरकार का गेले? राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात कोणी उभे केले? बाबा आपल्यातल्या आपल्यातच लबाडी करतात! त्यामुळे त्यांचे जहाज आता बुडायला लागले आहेत. जहाजाचे एखादे फाळकुट घेऊन ते या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी केला. 

                जगताप म्हणाले, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटून त्याचे बोर्ड लावणे हे हास्यास्पद आहे. पृथ्वीराज बाबांनी चाळीस वर्षात केलेली कामे एका बोर्डावर बसतील.  वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साकव पुल व रस्त्यासाठी त्यांनी दिलेल्या निधीत मोठी तफावत आहे. काही कामांमध्ये शासकीय निधीत ग्रामवर्गणीची भर घालून पूर्ण केली आहेत. अशा ठिकाणीही पृथ्वीराज बाबांनी स्वतःचे बोर्ड लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. 

                पैलवान मोहिते यांनी तालुक्यातील मोठी 110 गावे व 196 वाड्या-वस्त्यांमध्ये बाबांनी अनुक्रमे 20 ते 25 कोटी व काही लाखांची विकासकामे केल्याचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराला सुमारे 1 हजार कोटींचा निधी मिळू शकतो का? असा सवाल उपस्थित केला. तर पाटील यांनी काले येथील दक्षिण मांड नदीवरील पुलासाठी 2017-18 डॉ. भोसले व चरेगावकर यांच्या प्रयत्नातून चंद्रकांतदादांच्या माध्यमातून नाबार्ड मध्ये सदर काम बसले. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना त्याची माहिती काढून या कामाचाही माजी मुख्यमंत्र्यांनी नुकताच नारळ फोडण्याचे सांगितले. तसेच मागील सात-आठ वर्षापूर्वी भागात काही कामे झाली असून त्याच्या गंजलेल्या बोर्डलाही पृथ्वीराज बाबांनी हार घालून नारळ फोडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.