सोमवारपासून राज्यात कापूस खरेदी सुरू

कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस खरेदी सोमवार दि. 20 एप्रिलपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सोमवारपासून राज्यात कापूस खरेदी सुरू

कराड/प्रतिनिधीः-
कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस खरेदी सोमवार दि. 20 एप्रिलपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. शेतकर्‍यांनी पिकवलेला कापूस सध्या त्यांच्या घरांमध्ये आहे. तो खरेदी करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने आज निर्णय घेतला असून विदर्भ, मराठवाडयासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकवला जातो. तो खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये असणार्‍या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार आहेत. असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
शेतकर्‍यांचे अर्थकारण या कापूस उद्योगावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे. शेती पूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागातील जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाऊन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावी. चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन झाला आहे. तो शेतकर्‍यांनी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तिक नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात त्या शेतकर्‍यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाईल. कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या घरामध्ये कापूसही तो आता खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्यामुळे सदरचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.