शेतकऱ्यांची दिवाळी गोड न झाल्यास सहकारमंत्र्यांच्या दारात शिमगा करू  - सदाभाऊ खोत

एक रकमी एफआरपीची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार, कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, एक रकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड न केल्यास सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलन उभारून शिमगा करू.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड न झाल्यास सहकारमंत्र्यांच्या दारात शिमगा करू  -  सदाभाऊ खोत
कराड : तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. सदाभाऊ खोत, सोबत जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे

शेतकऱ्यांची दिवाळी गोड न झाल्यास सहकारमंत्र्यांच्या दारात शिमगा करू 

सदाभाऊ खोत : एक रकमी एफआरपीसाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्याचा इशारा

कराड/प्रतिनिधी :  

          टप्प्याटप्प्याने नव्हे; तर एक रकमी एफआरपीची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार, कारखानदारांकडून दिशाभूल केली जात असून त्यांनी हे धंदे बंद करावेत. त्यांनी एक रकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी.  अन्यथा, सहकारमंत्र्यांच्या दारात शिमगा करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी दिला.  

         येथील तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी 1 रोजी दुपारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.  कृष्णा कॅनॉलवरून सुरु झालेल्या मोर्चाचे तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोर्चात सहभागी शेतकरी उपस्थित होते.  

          आ. खोत म्हणाले, साखर आयुक्त कार्यालय हे काही वसुली कार्यालय नव्हे. जर त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसातून पैसे कापून देणी भागवायची असतील; तर हे बेकायदेशीर असून त्याला रयत क्रांतीचा पूर्णपणे विरोध आहे. उद्या पानपट्टीवाला, ग्रामपंचायत, देशी दारू दुकानवाला  त्यांच्याकडे वसुली मागायला येईल. मग, त्यांना काय ऊस बिलातून पैसे वसूल करून देणार का? असा सवाल उपस्थित करून ही मनमानी चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तसेच तुम्हाला वीजबील कपात करण्याचे परिपत्रक काढायला सवड आहे. मग, कायद्यानुसार एक रकमी एफआरपी देण्याचे परिपत्रक काढायला यांच्या पेनात शाही नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

        सचिन नलवडे म्हणाले, सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून प्रत्येक स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात येथूनच झाली आहे. सहकारमंत्रीही कराडचेच असल्यामुळे त्यांनी एक रकमी एफआरपी देण्याचे आदेश काढावेत. तसेच त्यांनी 15 दिवसाच्या आत त्यांच्या कारखान्याची एक रकमी एफआरपी जाहीर करावी. अन्यथा, सहकारमंत्र्यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर रयत क्रांती संघटना मोर्चा काढून धडक देईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.