बळीराजाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड - पंजाबराव पाटील

बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्याला उभारी देण्यासाठी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. त्यानुसार बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तमराव खबाले व संजय घाडगे यांची निवड झाली आहे.

बळीराजाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड -  पंजाबराव पाटील
कराड : नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना पंजाबराव पाटील. सोबत, बी.जी. पाटील व इतर.

बळीराजाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड 

पंजाबराव पाटील : नवी कार्यकारिणी जाहीर, उपाध्यक्षपदी उत्तमराव खबाले व संजय घाडगे यांची वर्णी 

कराड/प्रतिनिधी : 

      बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्याला उभारी देण्यासाठी संघटनेची नवी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामुळे तरुण, तडफदार शेतकऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार असून येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करणार आहोत. या नव्या कार्यकारिणीनुसार बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. 

     येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी २८ रोजी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी व नवी ध्येय्य-धोरणे जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

      पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड करण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तमराव खबाले व संजय घाडगे, जिल्हा युवाध्यक्ष किरण गोडसे, कराड प्रवासी वाहतूक संघटना सागर कांबळे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष अविनाश फुके, मलकापूर युवाध्यक्ष विशाल कसबे, मलकापूर शहराध्यक्ष मुन्ना साहब रज्जाक अत्तार, कराड दक्षिण युवाध्यक्ष पोपट जाधव, कराड तालुका उपाध्यक्ष रघुनाथ माटेकर व महिला आघाडी अध्यक्ष सुनिता लाडे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. 

     ते म्हणाले, महाराष्ट्रमध्ये सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. यावर राज्य व केंद्र सरकार कोणतीही उपायोजना करण्यास तयार नाहीत. सर्वजण आपापल्या राजकारणात गुंतलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या भूमिकेने बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार होत आहे. 

     तसेच सध्या बाजारात दुधाला चांगला भाव आहे. परंतु, दूध खरेदीमध्ये मोठा घोटाळा होत आहे. दूध संकलन केंद्रावर दुधाची खरेदी किलोमध्ये होत असून दुधाचे बिल लिटरमध्ये दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड तोटा होत आहे. तसेच शेती पंपाच्या विजेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना रात्रीची विज दिल्यामुळे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना जीवास मुकावे लागत आहे. कर्नाटक-तेलंगणा राज्याप्रमाणे आपल्या राज्यात शेती पंपाला दिवसा १० तास विज मिळाली पाहिजे, ही बळीराजाची मागणी आहे. 

       त्याचबरोबर सध्या डिझेल-पेट्रोलचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुपटी-तिपटीने वाढला आहे. याउलट उत्पन्न मात्र वाढलेले नाही. त्यामुळे शेतकरी बँकां आणि सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे. यासाठी येणाऱ्या काळात बळीराजा शेतकरी संघटना तरुण शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करणार आहे. याची राज्य सरकार व केंद्र सरकारने नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कराड तालुक्यात लोकवर्गणीतून वजनकाटा बसवणार 

आज ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. ऊसतोडी वेळेवर होत नसू  तोडीसाठी भरमसाठ पैशाची मागणी होत आहे. कारखानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. साखरकारखानदार उसाच्या वजन काट्यात मोठ्या प्रमाणात काटामारी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत आहेत. यावर पर्याय म्हणून बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या हंगामासाठी प्रायोगिक तत्वावर कराड तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी लोकवर्गणीतून उसासाठी वजनकाटा बसवणार असल्याचेही पंजाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.