शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे :कर्नल संभाजीराव पाटील

शिक्षण घेऊन पदवी मिळवणे महत्वाचे नसून कौशल्यावर आधारित शिक्षण संपादन करणे आवश्यक आहे. शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिशक्ती फ़ौडेशन, पुणे व विजय दिवस समारोह समिती, कराडचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराड येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील एका कार्यक्रमात केले.                     

शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे :कर्नल संभाजीराव पाटील

बापुजी साळुंखे महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न 

कराड / प्रतिनिधी 
          शिक्षण घेऊन पदवी मिळवणे महत्वाचे नसून कौशल्यावर आधारित शिक्षण संपादन करणे आवश्यक आहे. शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिशक्ती फ़ौडेशन, पुणे व विजय दिवस समारोह समिती, कराडचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराड येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील एका कार्यक्रमात केले.                                                                                                                        शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा महाविद्यालयीन स्तरावरील ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण २०२० हा बुधवारी दि. ४ मार्च रोजी संपन्न झाला. त्यावेळी कर्नल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विशेष उपस्थिती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र थोरात यांची होती तर अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे सहसचिव (अर्थ ) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी भूषवले.                           या समारंभाचे औचित्य साधून शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कराडचाही ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण समारंभ उपरोक्त समारंभावेळी संयुक्तपणे उत्साहात संपन्न झाला.                                           पुढे बोलताना कर्नल संभाजीराव पाटील म्हणाले, समाजातील अंधश्रद्धा, गरिबी व आळस झटकून टाकण्यासाठी महात्मा फुले, बापुजी साळुंखे, गाडगे महाराज यांनी शिक्षणाची दारे खेडोपाडी, डोंगराळ, दुर्गम अशा ग्रामीण भागात खुली केली. विद्यार्थ्यांनी शिस्त, शिष्टाचार व वागण्याची पद्धती सुधारली पाहिजे.                                                                                                 अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले, शिक्षणातून विद्यार्थी घडावा आणि त्याच्यात चैतन्य निर्माण व्हावे. स्वतःमधील परमेश्वर ओळखून स्वतःचा विकास साधता आला पाहिजे. जगणे सुंदर करण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत.त्यासाठीच बापुजी साळुंखे यांनी सुसंस्काराला महत्व दिले.                            कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उप प्राचार्य अधिकराव कणसे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार व प्रा. टी. एम. आतार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुरेश काकडे यांनी मानले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दयानंद कराळे, प्रा. दिलीपकुमार मोहिते, गुरुदेव कार्यकर्ते, स्नातक, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.