पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची चाचपणी

पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची चाचपणी

बारामती लोकसभेचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इंदापूर मध्ये दाखल होणार.


इंदापूर/प्रतिनिधी :- 

भाजप या पक्षाची महत्त्वकांक्षी असलेली बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी " मिशन बारामती ' गुरुवार पासून सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातच मिशन बारामतीची सुरुवात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पुण्यातून सुरू केली आहे. या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बारामती सह इंदापूर मध्ये बारामती लोकसभेचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

देशामध्ये १८ महिन्यानंतर  लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाचणार आहे. यामध्ये भाजपने १४० पेक्षा अधिक असे मतदारसंघ निवडले आहे की त्या मतदार संघामध्ये भाजपला गेल्या वेळेस अतिशय थोडक्यात मताने पराभव स्वीकारावा लागला आणि पक्ष त्या मतदार संघात दुसऱ्या नंबर वर राहिला अशा मतदारसंघात भाजपने अधिकचे लक्ष घातले असून यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश करण्यात आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जाणार आहेत. त्याच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्या भेटून बारामती लोकसभा मतदारसंघ कसा जिंकता येईल याबद्दल मार्गदर्शन करत आहेत.

मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. "ए फॉर अमेठी- बी फॉर बारामती' हे वाक्य गृहीतधरून अमेठी मतदारसंघ जिंकला भाजपने जिंकला आहे.तर  बारामती ही जिंकायचा असा दृढ निश्चय करून या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम निर्मला सीतारामन करत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री यांच्या दौऱ्यात २१ कार्यक्रमाचे आयोजन..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुणे दौरा हा तीन दिवसांचा आहे. तसेच हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत आणि यामध्ये २१ कार्यक्रम आयोजित केले आहेत. परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधी बरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन साधणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी त्या आढावा बैठकही घेणार आहेत.

पवारांच्या बालेकिल्ल्यांला कसा लागतोय सुरुंग..


माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी १९८४ पासून बारामतीचे प्रतिनिधित्व केले आहे. पवार हे पाचवेळा, अजित पवार एकवेळा आणि सुप्रिया सुळे या दोन वेळा बारामती लोकसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. मात्र महादेव जानकर यांनी लढवलेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीत बदल होऊ शकतो, अशी आशा भाजपला वाटू लागली आहे.

२०१४ ला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली. त्यामध्ये सुळे यांचे मताधिक्य हे ६९ हजार ७१९ मते एवढेच होते. पवार कुटुंबातील उमेदवाराला लाखापेक्षा कमी मताधिक्याने विजय मिळाल्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा १ लाख ५५ हजार मतांनी पराभव झाला. मात्र, कुल यांना पाच लाख ३० हजार मते मिळाली. ही राष्ट्रवादी काँग्रेसला विचार करायला लावणारी बाब होती. त्यामध्ये भाजपचा सर्वाधिक मतांचा वाटा हा खडकवासला मतदार संघाचा होता.

त्यामुळेच खडकवासला मतदार संघात अधिक ताकद लावण्याचे नियोजन भाजपने केले आहे. २०१४ व २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे इंदापूर मध्ये भाजपची ताकद अधिक वाढली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक लाख मतदान पेक्षा अधिक मतांचा जनाधार आहे. ते पवारांची कट्टर राजकीय विरोधक आहेत.

तसेच दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपच्या साथीला आहेत. पुरंदरकडे ही भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पुरंदर आणि भोरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निर्मला सीतारामन परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. पुरंदरमध्ये यापूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेची साथ भाजपला मिळेल. 

भोरमध्ये आतापर्यंत एकदाही भाजपला यश मिळालेले नाही. त्यामुळे सीतारामन यांनी भोरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वर भर दिला आहे. तसेच काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे भविष्यात भाजपला साथ देतील असा अंदाज वर्तवला जात असून थोपटे व पवार यांचा कडवा  राजकीय संघर्ष आहे. प्रत्येक वेळी आमदार संग्राम थोपटे यांना खिंडीत धरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबाच्या माध्यमातून झाले आहे.

तसेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खिळखिळीत करून सोडण्याचे काम निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केली जाणार असून बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून पवार कुटुंबांना शह देण्याचे काम भाजप सध्या जोरात करू पाहत आहे.