बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची बिनविरोध निवड

बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सुशांत नारायणराव मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. सुशांत मोहिते हे  एम. डी. पॅथॉलॉजीस्ट असून ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उच्च विद्याविभूषित तरुणाची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची बिनविरोध निवड
नवनियुक्त सरपंच डॉ. सुशांत मोहिते
बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची बिनविरोध निवड 
 

मंदाकिनी वाघमारे उपसरपंच :  निवडीनंतर  कार्यकर्त्यांचा जल्लोष 

कराड/प्रतिनिधी :

          तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सुशांत नारायणराव मोहिते यांची, तर उपसरपंचपदी मंदाकिनी सखाराम वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. डॉ. सुशांत मोहिते हे  एम. डी पॅथॉलॉजीस्ट असून ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उच्च विद्याविभूषित तरुणाची गावच्या सरपंचपदी  बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.    

           बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर (काका) व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांच्या पॅनेलने सत्ता मिळवली. दरम्यान, निवडणूक निकालानंतर सरपंच आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 29 जानेवारी रोजी आरक्षण सोडत पार पडली. त्यामध्ये बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले. त्यामुळे सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची निवड निश्‍चित मानली जात होती. परंतु, नियोजित निवडी लांबल्याने ग्रामस्थांची उत्सुकता आणखीनच वाढली होती. अखेर या निवडी बुधवारी 24 रोजी संपन्न झाल्या. त्यामध्ये सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

         बेलवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी 24 रोजी सरपंच निवड कार्यक्रम झाला. त्यामध्ये सरपंच पदासाठी डॉ. मोहिते व उपसरपंचपदासाठी मंदाकिनी वाघमारे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विनोद पुजारी यांनी  सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते व उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सदर निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

            या निवडीनंतर नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे माजी सरपंच पै. जगन्नाथराव मोहिते,  हर्षवर्धन मोहिते, डॉ. संपतराव मोहिते, अॅड. भारत मोहिते, अॅड. जे. बी. मोहिते आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

 

उच्च विद्याविभूषित सरपंच 

बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेले डॉ. सुशांत मोहिते हे  एम.डी पॅथॉलॉजीस्ट आहेत. कोविड काळात योद्धा म्हणून त्यांनी सलग सात महिने अखंडपणे सेवा केली. या काळातील त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले. गावच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उच्च विद्याविभूषित तरुणाची गावच्या  सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने  गावाच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.