स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू

भोळेवाडी फाट्यावरील घटना,दाजींना सोडून येताना घडली घटना

स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू
स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू

उंब्रज/प्रतिनिधी

 

पाटण पंढरपूर राज्य मार्गावर भोळेवाडी फाटा ता.कराड गावच्या हद्दीतील वळणावर कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने अपघात होऊन स्वीफ्ट कार रोड कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली यामध्ये कार चालक सुरज जालींदर कुंभार वय ३२ रा.उंब्रज ता.कराड हा युवक गंभीर रित्या जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दि.३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राज्य मार्गावर पाटण वरून उंब्रज दिशेला येणारी स्वीफ्ट कार क्रमांक एम एच ०१ सीडी ७८८६ ही भोळेवाडी फाटा येथे आली असता फाट्यावरील वळणावर कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने कार राज्य मार्गाच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आढळून अपघात झाला.धडक भीषण असल्याने कार चालक सुरज कुंभार हा गंभीर रित्या जखमी होऊन जागीच ठार झाला.अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांसह पोलिसांना समजताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

 

धोकादायक वळण बनले अपघाती क्षेत्र

 

दाजींना सोडण्यासाठी गेलेला सुरज कुंभार हा युवक माघारी येत असताना भोळेवाडी फाटा ता.कराड येथील वळणावर स्विफ्ट कार झाडावर आदळून गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.युवकाच्या अकाली अपघाती निधनाने उंब्रज परिसरावर शोककळा पसरली असून मोठा मित्रपरिवार असलेले कुंभार कुटूंबीय या घटनेने स्तब्ध झाले आहे.लहान मुलीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.याच वळणावर काही महिन्यांपूर्वी एक भीषण अपघात होऊन शिवडे ता.कराड येथील युवक ठार झाल्याची घटना घडली होती यामुळे अपघाती क्षेत्र म्हणून बांधकाम विभागाने उपाययोजना प्राधान्याने योजल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे.