निवृत्त डॉक्टर चोरेकरांसाठी सरसावले...!

ऋणानुबंधामुळे डॉ.सुनील कोडगुले यांची घालमेल

निवृत्त डॉक्टर चोरेकरांसाठी सरसावले...!
चोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.सुनील कोडगुले,डॉ.संजय कुंभार व डॉ सुजाता माने आणि सहकारी स्टाफ ( छाया : अनिल कदम उंब्रज)

उंब्रज/ प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या काळात अनेक कोरोना योद्धे आपल्या जीवाची बाजी लावून तण,मन अर्पून जनसेवेचे कार्य करीत आहेत. यामध्ये समाजाच्या विविध स्तरातील लोक सामाजिक बांधिलकी म्हणून खारीचा वाटा उचलत आहेत.अशीच कर्तव्यनिष्ठा जपली उंब्रज येथील  सेवानिवृत्त डॉ.सुनील तुकाराम कोडगुले यांनी २५ वर्षे चोरे भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर तसेच जिल्ह्याच्या इतर भागात वैद्यकीय सेवा दिल्यानंतर काही वर्षांपूर्वी डॉ.कोडगुले शासकीय वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले.यानंतर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे लोकसेवेचे कार्य अखंडित चालू आहे.परंतु चोरे भागातील वाढती कोरोनाबधित लोकांची साखळी डॉ.कोडगुले यांना स्वस्थ बसू देत नव्हती यामुळे त्यांनी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.संजय कुंभार यांना सोबतीला घेत चोरे गावाला भेट दिलीच आणि अनुभवाचे चार शब्द ही सांगितले.

खरे तर चोरे विभागात आणि इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.कोडगुले यांनी आपल्या वैदयकीय सेवेतील बरीच वर्षे खर्ची घातली आहेत. त्यांची बहुतांश सेवा ही याच विभागात झाल्याने त्यांना चोरे विभागातील घर ते घर आणि माणूस नि माणूस तोंडपाठ आहे.यामुळे ज्यावेळी चोरे विभागात कोरोना बाधित लोकांचे आकडे वाढू लागले तसे डॉ.कोडगुले यांना कोरोना महामारीने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी फोन करायला सुरुवात केली. यामुळे डॉ.कोडगुले यांनी सामाजिक बांधिलकी जपत चोरेकरांच्या हाकेला प्रतिसाद देत चोरे गावाला भेट देऊन परिस्थितीची कल्पना घेतली तसेच गावातील लोकांना आरोग्यविषयक सल्ला देऊन आपल्यातला डॉक्टर अजून रिटायर झाला नाही याचीच चुणूक दाखवली.

सोमवार दि.१० रोजी दुपारी चारच्या सुमारास उंब्रजचे वैदयकीय अधिकारी डॉ.संजय कुंभार आणि डॉ.सुनील कोडगुले यांनी चोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले त्या ठिकाणी इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता माने व त्यांचा सर्व स्टाफ आपल्या कामात व्यस्त होताच यानंतर डॉ.कुंभार यांनी वनवासमाची पॅटर्न बद्दल माहिती देऊन येथे सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती असल्याची कल्पना दिली.अशा वेळी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राने काय उपाययोजना केल्या याबाबत डॉ माने यांच्याशी सल्लामसलत केली आणि यापुढे नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजे व आरोग्य सेवकांनी कशा प्रकारे सेवा दिली पाहिजे याबाबतची चर्चा डॉ कोडगुले व सर्वांनी मिळून केली.

यामधून डॉ सुनील कोडगुले यांची चोरे विभागाबद्दल व आपल्या कर्तव्याबद्दल असणारी तळमळ स्पष्ट पणे जाणवली त्यांनी उंब्रज व इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा सलोखा साधत डॉ कुंभार यांना चोरे विभागाला मदत करा बरं का ! अशी केलेली विनंती खरंच मनाला भावली असे कोरोनयोध्ये असतील तर नक्कीच चोरे विभाग कोरोनामुक्त होणार याबाबत चोरेकरांच्या मनात तिळमात्र शंका राहिली नाही.