समाजशिल व विद्यार्थी प्रिय शिक्षक -आनंदराव साळुंखे सर

३१ जुलै रोजी २७ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने चोरे ता.कराड येथे सत्कार समारंभ १० वाजता आयोजित केला आहे

समाजशिल व विद्यार्थी प्रिय शिक्षक -आनंदराव साळुंखे सर
समाजशिल व विद्यार्थी प्रिय शिक्षक -आनंदराव साळुंखे सर

समाजशिल व विद्यार्थी प्रिय शिक्षक -आनंदराव साळुंखे सर

सन १९९९ पूर्वीचा शैक्षणिक काळ हा फारच खडतर मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याकाळी अनेक शिक्षकांनी बहुमुल्य असे योगदान दिले. प्रसंगी स्वताच्या कुटुंबाची पर्वा न करता विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वस्वी त्याग केला. म्हणूनच आज देशविदेशातील प्रत्येक पातळ्यांवर आपला विद्यार्थी चमकत आहे. अशाच पध्दतीने विद्यार्थी केंद्रबिंदू माणूस  तन मन धन अर्पण करुन शिक्षण क्षेत्रात तब्बल तीन दशके ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे चोरे येथील वाग्देवी शिक्षण प्रसारण मंडळाच्या जिजामाता विद्यालयाचे शिक्षक आनंदराव साळुंखे सर आज ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने...

   कराडच्या पश्चिम भागात डोंगर कपारीला अनेक गावे वसली आहेत आजही काही गावांमध्ये जाण्यासाठी वाहनांची सोय नाही.अशावेळी त्या गावात जाणे आणि  शिक्षकी धर्म निभावणे म्हणजे आव्हानात्मक काम मात्र अशा कठीण परिस्थितीवर मात करत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आणि उद्याचा सुजान नागरिक घडविण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेक शिक्षकांनी योगदान दिले. त्यापैकीच मूळचे वाजेवाडी येथील आनंदराव साळुंखे सरांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.सरांनी उमेदीचा काळ हा डोंगर कपारीत वसलेल्या वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी खर्ची घातला. काही मैलांची पायपीट करून त्यांनी ज्ञानदानाचे काम केले.व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.सध्या उंब्रज गावचे रहिवाशी असणाऱ्या या प्रतिभावंत शिक्षकाचे योगदान शिक्षण क्षेत्रात अनमोल आहे.     

वास्तविक आनंदराव उत्तम साळुंखे  सरांनी १९९४ रोजी शिक्षक म्हणून पहिल्यांदा चोरे विभागातील डोंगर पायथ्याला असणाऱ्या मस्करवाडी या अति दुर्गम गावात ज्ञानदानाचे काम सुरू केले. मस्करवाडीचा प्रवास म्हणजे धडकी भरवणारा, डोंगर कपारीतून मार्ग शोधत मस्करवाडीला जावे लागते. मात्र त्यावेळी साळुंखे सरांनी तब्बल आठ वर्षे मस्करवाडी सारख्या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आटापिटा केला. तोही तब्बल ७ वर्षे बिनपगारी. शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान  व सात वर्षे बिनपगारी नोकरी करणारे साळुंखे सर आज विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत.साळुंखे सरांचे मुळगाव वाजेवाडी मात्र शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने ते ज्ञानदानाच्या कार्याकडे वळले. वाजेवाडीतून मस्करवाडीचा प्रवास हा तब्बल पंधरा किलोमीटरचा मात्र वाहनांची सोय नसल्याने ते सोमवार ते शनिवार असे न्यानदान करून वाजेवाडी या मूळ गावी पायपीट करत घरी यायचे व सोमवार उजाडला की दोन दिवसाचा जेवणाचा डबा घेऊन परत मस्करवाडीला मुक्कामी थांबायचे. 

मस्करवाडी येथे आठ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी वेणेगाव ता.सातारा येथे एक वर्ष ज्ञानदानाचे काम केले.  त्यानंतर चोरे येथे चार वर्ष व त्यानंतर पुन्हा वेणेगाव असा त्यांचा प्रवास राहिला.शिक्षण क्षेत्रात  २७  वर्षे सेवा केल्यानंतर आज शनिवारी ३१ जुलै रोजी ते चोरे गावच्या जिजामाता विद्यालयातून सेवानिवृत्त होत आहेत. आनंदराव साळुंखे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.  त्यांच्या शिकवणीतून अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वातून  विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेवून वाटचाल सुरू ठेवली आहे.साळुंखे सरांच्या सेवानिवृत्तीमुळे या शाळांचे आजी-माजी विद्यार्थी भावनाविवश झाले आहेत. 
      
    सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या साळुंखे सरांवर लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांचे विचार ऐकण्याची संधी बालवयात त्यांना मिळाली तसेच लोकनेत्यांच्या परिवाराशी त्यांचे कौटुंबिक संबंध जुळाले होते. शिक्षकी पेशा त्यात समाजसेवेची आवड यामुळे साळुंखे सर ज्या शाळेमध्ये ज्ञान दानाचे काम करायचे त्याच गावचे ते होऊन जायचे. 

  विद्यार्थी प्रिय  शिक्षक म्हणून नावारुपाला आलेले साळुंखे सर सेवानिवृत्त होतानाही आजही समाजाशील  आहेत.  त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या चोरेच्या शाळेतून आज सन्मान पुर्वक ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांना भावी आयुष्यात. आरोग्यमय दिर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना!

- अनिल कदम,उंब्रज