शिंदे साहेब सावध रहा...दगा फटका होऊ नये

साताऱ्याची माती क्रांतिकारकांची भूमी,मुंबई आपल्या हक्काची

शिंदे साहेब सावध रहा...दगा फटका होऊ नये

अनिल कदम / उंब्रज

साताऱ्याचे सुपुत्र आणि ठाण्याचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी लागली आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला अनेक धक्कादायक आणि अकल्पित घटना घडल्या आणि शिंदे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली धर्मवीर आनंद दिघे याच्या तालमीत तयार झालेले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेची विचारधारा जोपासणारे शिंदे यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व नव्या जबाबदारीने उजळून निघू लागले आहे पन्नास आमदारांचा गट वेगळा करून मूळच्या शिवसेने बरोबर फारकत घेतली महाराष्ट्राच्या  इतिहासात न भूतो न भविष्यती बंड करून सवता सुभा निर्माण केला पण शिंदे साहेब सावध राहा दगा फटका होऊ नये मुंबई आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा विसरू नका गनीम नेम धरून बसलाय एक उद्योग गुजरातला गेला आता मुंबई तरी वाचवा अशी भावनिक साद महाराष्ट्रातील जनता घालू लागली आहे.

 

मराठी माणसाची मुंबई मोठ्या आत्मविश्वासाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेनी शिवसेनेच्या तरुण पिढीच्या हातात सोपवली अनेक चटके सहन करून मुंबईचे अस्तित्व जपले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे सहा हुतात्मे कामी आले अनेक क्रांतिकारी नेत्यांनी आपल्या रक्ताचे पाणी मुंबई वाचवण्यासाठी केले आहे एकेकाळी लाखो लोकांना संबोधित करताना शाहीर अमर शेख यांना कधीही माईकचा सहारा घेण्याची गरज पडली नाही एवढी ताकत महाराष्ट्राच्या आवाजात होती राजकारण करीत असताना काही डावपेच लढवावे लागतात याशिवाय संधी निर्माण होत नाही आणि मिळालेल्या संधीचे सोने जनतेसाठी करायचे हा महाराष्ट्र धर्म आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून उभे करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

 

जनता हेच माझं टॉनिक आहे असे एका कार्यक्रमात आपण सांगितले होते परंतु हाच महाराष्ट्र कोणत्याही दबावाला बळी न पडता उभा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे छत्रपती शिवरायांच्या मातीचा गुणधर्म आपण पाळा मोडेन पण वाकणार नाही हा करारी बाणा आपल्या अंगी दिसत असून विधिमंडळातील भाषणात आपण वक्तृत्व दाखवून दिले पायाला भिंगरी लावून केलेली भिरकीट जनतेने पहिली आहे काही निर्णय खरच जनहीताचे घेतले आहेत परंतु राजकारणात इच्छा आकांक्षा जागृत झाल्या की आपल्याच जवळच्या माणसाचा घात करण्याचा धोका निर्माण होतो आपल्याबरोबर चाळीस जण आहेत प्रत्येकाच्या काही अपेक्षा आहेत सत्ता आणि खुर्चीच्या मोहात काहीही होऊ शकते याचे उदाहरण आपण सुरत,गुवाहाटी आणि गोवा दोऱ्या दरम्यान अनुभवले आहे.

 

शिंदे गट आणि भाजप यांची युती होऊन सरकार स्थापन झाले अनेक समस्या आपल्यापुढे उभ्या ठाकल्या असून मराठा आरक्षण,बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे कळीचे मुद्दे समोर असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आपली वाटचाल मराठी माणसांच्या हिताच्या दृष्टीने व्हावी अशी धारणा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आबालवृद्ध जनतेची आहे मराठी माणसांची मुंबई गिळंकृत करण्याचा घाट घातला जात असल्याची पक्की खूणगाठ मनात घर करू लागली आहे.अगोदरच मुंबईतील मराठी माणूस बाहेर फेकला गेला आहे आणि आता उरलीसुरली आशा शिवसेनेच्या दोन्ही गटांवर अवलंबून आहे धनुष्यबाणाची धास्ती आणि शिवसेनेचा दरारा मुंबई महाराष्ट्राची असल्याबाबत साक्ष देत आहे परंतु उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदे गटाची सेना अशी उभी फूट महाराष्ट्राला धोकादायक असून राजकारण करा परंतु किमान एकशे सहा हुतात्मे का झाले याचा विचार करा म्हणजे उत्तर आपोआपच मिळेल.शिंदे साहेब सावध रहा...दगा फटका होऊ नये साताऱ्याची माती क्रांतिकारकांची भूमी असून,मुंबई आपल्या हक्काची आहे सहजच कुणाच्या घशात जाऊ देऊ नका अशी साद मुंबईप्रेमी मराठी माणूस घालू लागला आहे.