'गर्तेत' सापडलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज बाबांची गरज

'गर्तेत' सापडलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज बाबांची गरज

भारतीय राजकारणाची जनक असलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या ओहोटी लागली आहे.अनेक राजकीय व्यक्तिमत्वांचा सर्वागीण विकास काँग्रेस पक्षाने केला आहे.काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार असल्याचे मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक दशके, देशावर काँग्रेसने राज्य केले.यामध्ये त्यावेळच्या नेत्यांनी देशाचा सर्वांगीण विकास साधायचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामध्ये एम्स सारखे हॉस्पिटल्स, आयआयटी व आयआयएम सारख्या संस्था, वैज्ञानिक संस्था अश्या अनेक सरकारी संस्था भारतीयांसाठी उभारल्या. तसेच डिजिटल भारत करण्याच्या उद्देशात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे धोरण व दूरदृष्टी देश कधीच नाकारू शकत नाही. अश्या या काँग्रेस पक्षाने सत्ता काळात भारत देशाला जगातील इतर देशांच्या बरोबरीत आणले यासाठी सर्व माजी पंतप्रधानांचे धोरणच कारणीभूत आहे. अश्या या काँग्रेस पक्षाची सत्ता कायमच होती असे नाही ७० च्या दशकात जनसंघाची सत्ता होती त्यानंतर १९९५ साली भाजपा प्रणित एनडीए ची सत्ता होती त्यानंतर काँग्रेसप्रणित युपीए ची सत्ता आली. परंतु २०१४ नंतर काँग्रेस पक्षाला घरघर लागली,  मोठ्या प्रमाणात मार्केटिंग स्ट्रॅटेजी चा वापर करीत भाजपने मनमोहन सिंह यांचे सरकार पाडले. २०१४ नंतर काँग्रेसच्या अनेक नेते मंडळींनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतले, काँग्रेस पक्षाने अनेकांना चिखलातून उचलून सत्तेचा मुकुट दिला. सत्ता, पैसा, प्रतिष्ठा आणि पद अशा मांदियाळीत उंच शिखरे त्यांनी गाठली परंतु ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षाला अडचणीच्या काळात खिंडीत गाठत पाठ दाखवली. अश्या परिस्थितीत काँग्रेसच्या काही जुन्या बड्या जाणत्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला नाही. जे काँग्रेसच्या विचारांशी पक्के आहेत असे नेते आजही काँग्रेससोबत आहेत. यामुळेच जुन्या व नवीन नेत्यांचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मेळ घालून पक्ष वाढीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे. 

केंद्रीय पातळीवर मंत्रिपदाचा अनुभव असलेले तसेच जे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून काम पाहिले आहे आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत असे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर कोणतेही पद स्वतःहून न घेता इतर सहकाऱ्यांना त्यांनी संधी दिली. पक्षाशी एकनिष्ठ, प्रशासकीय कामात हातखंडा तसेच स्वच्छ प्रतिमा या गुणांनी पूर्ण असलेले पृथ्वीराज चव्हाण हे आजपर्यंत कोणतेही पद त्यांच्याकडे येत असताना सुद्धा कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत आलेले आहेत व भाजप सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे इंजिनिअर आहेत, अश्या उच्च शिक्षित व्यक्तीला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतः मध्यरात्री फोन करून कराड लोकसभेतून निवडणूक लढवावी असे सांगितले व अश्या प्रकारे राजीव गांधींच्या इच्छेनुसार पृथ्वीराज बाबा राजकारणात आले व आजतागायत त्यांनी काँग्रेस चा अखंड हातात ठेवत पक्षाच्या धोरणानुसार वागत आले आहेत. २०१९ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण हे पहिले नेते होते कि, ज्यांनी निकालादिवशीच भाजपा पुन्हा सत्तेत येईल याबद्दल साशंकता आहे व येत्या आठवड्यात महाराष्ट्राला वेगळे चित्र बघायला मिळेल. असे वक्तव्य पृथ्वीराज बाबांनी केल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपा ला सत्तेपासून दूर करण्यात यश मिळविले. 

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतेही पद दिले गेले नाही. याबद्दल जाणकारांचे मत आहे कि,  पृथ्वीराज बाबांनी सरकारमधील कोणतेही पद न घेऊन आपला पक्षावरील होल्ड कायम ठेवत एक आब राखला आहे व हाच मेसेज पूर्ण राज्यात गेला आहे. कारण मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला तसेच काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवर अनुभव असलेल्या व्यक्तीला कोणतेही पद सहज मिळत असताना सुद्धा इतर नेत्यांना संधी मिळावी या उद्देशाने मागे राहणाऱ्या नेत्याला पक्षानेच विचार करून त्यांचा सन्मान होईल अशी संधी देत पक्ष वाढीसाठी उपयोग केला पाहिजे असे अनेक जाणकारांचे मत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यात प्रशासकीय कौशल्य आहेतच तसेच त्यांचे राजकीय वजन सुद्धा तितकेच मोठे आहे. त्यांना पक्षाचा केंद्रीय पातळीवर अनुभव आहे व राज्याच्या राजकारणाची जाण आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंहाच्या सोबत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रिपद भूषविलेल्या नेत्याला केंद्रीय पातळीवरचे ज्ञान आहे तसेच राज्यात मुख्यमंत्रीपद भूषविल्यामुळे राज्याच्या प्रशासनाची व राज्यातील प्रश्नांची सुद्धा जाण आहे तसेच महत्वाच्या चारही सभागृहाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. अश्या नेत्याचा काँग्रेस पक्षाने योग्य पद्धतीने विचार करून संधी दिली तर त्याचा फायदा पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही  कारण आज राज्यात काँग्रेसला सर्वसमावेशक चेहऱ्याची गरज आहे कि ज्याला प्रशासकीय ज्ञानासोबतच राज्याच्या प्रश्नांबद्दल जागरूक असणारा व वेळोवेळी भाजप च्या केंद्रीय सरकारवर आसूड उगारणारा नेता म्हणून आज काँग्रेस पक्षाकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावापेक्षा दुसरे कोणतेच नाव समोर नाही. काँग्रेसचे हे जुने जाणते व अनुभवी नेतेच पक्षाला नवचैतन्य देतील, याच नेत्यांनी तरुणांनी राजकारणात यावे असा नारा देत अनेक तरुणांना राजकारणात संधी दिलेली आहे. 

कोरोना महामारीत घरातूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आसूड उगवायची एकही संधी सोडली नाही कराड सारख्या तालुका पातळीवरील गावातून देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मुद्देसूद आणि सखोल विश्लेषणाने आरोपांचा धुरळा उडवला आहे आणि केंद्राने सुद्धा हे मुद्दे कधीच खोडुन काढले नाहीत याचा अर्थ यामध्ये तथ्य आहे.काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर थांबवायची असेल तर आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव पक्षश्रेष्ठींच्या पुढे नसेल कारण गेल्या चार दशकांपासून आ चव्हाण यांचे कुटुंबीय काँग्रेस विचाराचे पाईक आहेत अनेक घटनांचे साक्षीदार असलेले पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस विचारांनी तावून सुलाखून निघालेले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण, उच्च शिक्षित अशा एक ना अनेक जमेच्या बाजू असणारे बाबा एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत देशातील सर्वच प्रमुख राजकीय व्यक्ती अधिकारी यांच्या मनात बाबांच्याबद्दल एक आदरयुक्त धाक आहे आजअखेर कोणताही आरोप नसणारे एक निष्कलंक व्यक्तिमत म्हणून बाबांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. काँग्रेस पक्षाची अडकलेली गाडी सुरू करण्यासाठी बाबांसारखा अनुभवी चालकच हवा आहे अन्यथा आजअखेर झालेले असे गंभीर अपघात कॉग्रेस पक्षाला वारंवार झेलावे लागणार आहेत आणि यामुळे होणारे नुकसान हे कधीही न भरून येणारे असणार आहे. काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज आजच्या घडीला एकतर पक्ष सोडून दुसऱ्याच्या दावणीला गेले आहेत नाहीतर वयोमानामुळे घरातच बसून राहिले आहेत यामुळे कार्यकर्ते सैरभैर होऊन दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला नाईलाजाने जात आहेत.

एके काळी सुवर्णयुग अनुभवलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेत असताना अनेकांनी ओरबडले परंतु सत्तेवरून पायउतार होताच पाठीत खंजीर खुपसायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही. विचार आणि नीतिमत्ता मातीमोल होऊन सत्ता आणि खुर्ची याला महत्व प्राप्त झाले आहे.यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या सच्चा काँग्रेसप्रेमी व्यक्तीच्या हातात पक्षाची महत्वाची जबाबदारी सोपवली तर निश्चितच काँग्रेस पक्षाला राखेतून भरारी मारलेल्या फिनिक्स पक्षासारखी कामगिरी करता येईल अशक्य असे काहीच नसते हीच बाब स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आणीबाणी नंतर दाखवून दिलेली आहे.

काँग्रेस पक्षात पृथ्वीराज बाबांचे स्थान निश्चितच फार वरचे व महत्वाचे आहे मात्र यासाठी पक्षाने दूरगामी विचार करणे गरजेचे आहे कारण काँग्रेसच्या अष्टप्रधान मंडळात असणाऱ्या व्यक्ती आता पिकलं पान म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत यामुळे जुनं ते सोन म्हणून एकनिष्ठ व्यक्तीला राज्यात अथवा केंद्रात सन्मानाने बोलावले तर निश्चितच बाबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सुवर्णयुग पुन्हा प्राप्त होईल. काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी बाबांच्या हातात हात मिळवणे खूप गरजेचे आहे याशिवाय राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश गोवा याठिकाणी झालेले प्रकार थांबणार नाहीत अन्यथा काँग्रेस औषधालाही सापडणार नाही ही चाललेली चर्चा खरी व्हायला वेळही लागणार नाही.

शशिकांत पाटील

संपादक