कॉग्रेस आत्मचिंतन करणार का ?

काळानुसार बदल करण्याशिवाय कुणालाच गत्यंतर नसते. कधी कधी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन इतिहास घडला आहे. पण, त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, नेतृत्वगुण आणि कौशल्यही गरजेचे असते. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मला असाल आणि सगळ्या सुविधा एका चुटकीवर तुम्हाला उपलब्ध असूनही जर आपण वेंधळेच राहत असू तर मग हे सर्वस्वी अपयशच कुणाचं आहे, यावर विचार व्हायला हवा. कॉंग्रेसने सद्यस्थितीवर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, त्यातच त्यांचे शहाणपण दडलेले आहे.   

कॉग्रेस आत्मचिंतन करणार का ?

कृष्णाकाठ / अशोक सुतार 

            कॉंग्रेसमधील स्थिती अजूनही सुधारलेली नाही. ज्योतिरादित्य सिंधीयासारखे युवा नेते कॉंग्रेसमधून बाहेर जात आहेत. जुन्या नेत्यांनाच संधी देऊन कॉंग्रेसला नेमके काय साध्य करायचे आहे. जर अजूनही काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरजच नाही, असे पक्षाला, नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना वाटत असेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांना दिशाहीन होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. मुळात जे काँग्रेसमध्ये घडत आहे, त्यावर कुणी भाष्य करायला तयार नाही, आणि जर कुणी पक्षातील नेता किंवा कार्यकर्ता बोललाच तर त्याचे पंख कापल्याशिवाय राहत नाहीत. हाच कित्ता गिरविला जात असल्याने याचे फळ पक्ष भोगतो आहे. भारतात संसदीय लोकशाही असूनही मोदींनी २०१४ च्या आधी ‘हर घर मोदी’ आणि ‘अब की बार मोदी सरकार’ या भडकाऊ घोषणांनी अप्रत्यक्षरीत्या अध्यक्षीय लोकशाही भारतीयांच्या मनावर बिंबवली आहे. याचमुळे काँग्रेसला नेतृत्वबदल करणे गरजेचे आहे. अजून किती वर्षे नेहरूंचे कर्तृत्व आणि गांधींच्या नावे ते पक्ष हाकणार आहेत, कुणास ठाऊक ? काळानुसार बदल करण्याशिवाय कुणालाच गत्यंतर नसते. कधी कधी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन इतिहास घडला आहे. पण, त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, नेतृत्वगुण आणि कौशल्यही गरजेचे असते. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मला असाल आणि सगळ्या सुविधा एका चुटकीवर तुम्हाला उपलब्ध असूनही जर आपण वेंधळेच राहत असू तर मग हे सर्वस्वी अपयशच कुणाचं आहे, यावर विचार व्हायला हवा. कॉंग्रेसने सद्यस्थितीवर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, त्यातच त्यांचे शहाणपण दडलेले आहे.                                                एकेकाळी देशावर सत्ता गाजवणाऱ्या कॉंग्रेसची वाताहात झालेली दिसत आहे. ना कार्यकर्ते, ना प्रबळ नेतृत्व ! कॉंग्रेसला चांगला अध्यक्ष केव्हा मिळणार आणि कॉंग्रेस क्रियाशील केव्हा होणार, हाच सवाल सर्वत्र चर्चिला जात आहे. जुन्या इतिहासावर अवलंबून राहण्याचे दिवस संपले असून लोकांसाठी काहीतरी रचनात्मक, विकासात्मक करणे गरजेचे आहे. कुठल्याही पक्षाला उतरती कळा लागते तेव्हा एकतर पक्षाचे जबाबदार पदाधिकारी निष्क्रिय असतात किंवा आहे त्या परिस्थितीत निद्रा घेत असतात. भाजपाचे संख्याबळ बहुसंख्य असले तरी सत्ता बनवताताना २०१९ मध्ये भाजपला दुसऱ्या पक्षांची गरज लागेल, असे वाटत असताना लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी तब्बल ३३० उमेदवार निवडून आणले. काँग्रेसला खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.                                                                                  राहुल गांधी हे कॉंग्रेसमधील चांगले नेतृत्व आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये त्यांनी भाजपला टक्कर दिली.परंतु  लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दुसर्यांदा पराभव झाला त्यावेळी ते पराभव पचवू शकले नाहीत आणि सुट्टीसाठी परदेशी दौऱ्यावर गेले. तर कॉंग्रेसची झुंज थांबली. त्यानंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनाम दिला.पक्ष जेव्हा राजकीय संकटात होता, त्यावेळी राहुल गांधी यांनी कच खाल्ली, हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा खरा पराभव होता. फिनिक्स पक्ष्यासारखे त्यांनी राखेतून स्वर्ग निर्माण करण्यासाठी आत्मबल टिकवून ठेवणे आवश्यक होते. तेवढे बळ त्यांच्यात का उरले नाही ? तर राहुल यांची इच्छाशक्ती संपली. असे म्हटल्याने कोणाची इच्छाशक्ती संपत नाही, कारण इच्छाशक्ती अनंत आहे. परंतु त्या इच्छाशक्तीला प्रयत्न, संघटन आणि लोकसंवादाची जोड दिली पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करणारे कॉंग्रेससाठी आवश्यक आहे, हे पक्षश्रेष्ठींनी वेळीच ओळखून त्यांना पुढे का आणले नाही, हा महत्वाच प्रश्न उद्भवतो. कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय म्हणवला जात आहे, पण तो इतर नेत्यांनी पुढे का आणू नये, त्यांना संधी का देऊ नये. देशातील युवा मनुष्यबळ कमी नाही. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि संविधानाची ओळख करून त्यांच्या राजकीय आकांक्षा, त्याबद्दल जिज्ञासा आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा फुलवली तर हे सर्व शक्य आहे.                                                                           ज्या पक्षात पंडित नेहरू, लाल बहाद्दूर शास्त्री, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, सी. डी. देशमुख, वल्लभभाई पटेल, राजीव गांधी यांच्यासारखे क्रियाशील नेते होते, त्या पक्षात बोट दाखवण्यासारखा कुणी सक्षम नेता का राहिला नाही, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कुणालाही वास्तव मान्य करायचे नाही किंवा मग ही मोठी मंडळी बाहेर जात असेल तर आपले भविष्य पक्षात मोठे होईल या आशेवर जर काँग्रेसचे कार्यकर्ते जगत असतील तर मग काँग्रेस लवकरच भुईसपाट होईल यात शंका नाही. प्रत्येक पक्षाचे भवितव्य नेत्यांवर आणि त्यांना दिलेल्या कामगिरीवर व त्यांनी बजावलेल्या कर्तबगारीवर अवलंबून असते. नवीन होतकरू नेत्यांना सोबत घेत पक्षाची प्रगती, विस्तार करणे गरजेचे असते. पूर्वी राष्ट्रीय पक्षाच्या पाठीमागे जनता उभी राहत असे. आता प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढण्यास सुरुवात झाली आहे, काही प्रादेशिक पक्ष इतर पक्षांना सोबत घेऊन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करत आहेत. उदा. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार अस्तित्वात आहे. प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व प्रादेशिक  राजकारणात वाढत आहे.                                                                                                                                 देशाची सत्ता मोदी-शहा या लोकांच्या हातात देऊन चूक केली, ही चूक अजूनही जनतेला उमगलेली नाही आणि याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत ते विरोधक. कारण सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे नैतिक आणि तात्विक अधिकार संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधकांना दिलेले आहेत. संविधानातील अनेक अशा तरतुदी, कायद्फे असे आहेत की, सत्ताधाऱ्यांना विरोधक सहज अडवू शकतात, चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करू शकतात. परंतु विरोधकांची मने खचली आहेत, त्यांच्यात ताकदच उरलेली नाही. विरोधक मूग गिळून गप्प असतील आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात जर जनतेचा लढा उभा करू शकत नसतील ते विरोधकच काय कामाचे ? काँग्रेसमध्ये प्रियांका की राहुल यावर भाष्य करण्यापेक्षा नेतृत्व गुण असलेला सुयोग्य नेता समोर आणायची ही महत्वाची वेळ आहे. अनेक कॉंग्रेस नेत्यांनी इतिहासात बरेच योगदान दिले असले तरी सद्यस्थितीत संघटन कसे करता येईल, समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांना एकत्र कसे आणता येईल, याचा अजेंडा असणारा जाणकार नेता हवा आहे. एकमेकांविरोधात कुरघोड्या करून, गटबाजी करून कोणताही पक्ष मोठा होत नाही. देशात अनेक घटना घडत आहेत, लोकही विद्यमान केंद्र सरकारवर नाराज आहेत. परंतु या नाराजीचा फायदा घेत लोकांमध्ये भाजपाविरोधी वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पक्षामध्ये जुन्याच नेत्यांना किती दिवस पदे द्यायची हे ठरले पाहिजे, नवीन नेतृत्व समोर आणायला नको का ? त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधीयासारखे युवा नेते भाजपची वाट धरत आहेत.                                                                                                            स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस नावारूपाला आली ती नेतृत्वामुळे. काँग्रेसमध्ये गांधींनंतर जेव्हा सामान्यातील सामान्य नेतृत्व समोर आले तेव्हा जनतेला आश्वासक वातावरण निर्माण झाले. प्रजासत्ताक ही भावना निर्माण व्हायला लागली आणि हळूहळू महिला, शेतकरी, युवक आणि अतिमागास वर्ग काँग्रेससोबत जोडला गेला. आज कॉंग्रेससोबत हा वर्ग का राहिलेला नाही. कॉंग्रेसने या वर्गाला गृहीत धरले होते, कोणीच सर्वसामन्याला विचारात नव्हते, त्यामुळेच नरेंद्र मोदी उदयास आले. जेव्हा एका पक्षात क्रीयाशिलातेची कमी होते, तेव्हा लोक क्रियाशीलता असलेल्या पक्षाचा आधार घेतात. नेहरू व इंदिराजींनी कॉंग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले असले तरी शास्त्री, पटेल, नरसिंगराव, मन मोहन सिंग यांचे कॉंग्रेसप्रती योगदान नाकारता येत नाही. जनतेला सर्व सामान्य नेतृत्व हवे आहे, जे देशातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल. आज गांधी घराण्याभोवती कॉंग्रेस आणि नेते का घुटमळत आहेत, गांधी घराण्याभोवती निष्ठा दाखवण्याची चाधोध का लागली आहे ? आज सिंधिया भाजपमध्ये गेले, उद्या पायलट जातील आणि कोणीही युवा नेते जातील. सिंधियासारखी राहुल यांच्या फळीतली लोक कॉंग्रेस सोडून जात आहेत, म्हणजेच युवा नेत्यांचे पंख छाटण्याचे काम सुरु झाले आहे. असे तर नसेल ? कॉंग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, अन्यथा येत्या लोकसभेतही कॉंग्रेसचे पानिपत होण्याची शक्यता नाकारता ये नाही.