काँग्रेसचा ‘आनंद’ हरवत ‘धैर्य’ करणार घोषणा

काँग्रेसचा ‘आनंद’ हरवत ‘धैर्य’ करणार घोषणा


कराड / प्रतिनिधीः-
कराड-दक्षिण व उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे दोन नेते उद्या शुक्रवारी मेळावा घेवून आपला निर्णय जाहिर करणार आहेत. ज्यासाठी सवते राहण्याचा निर्णय घेतला. तेच घरात येत असल्याचे धैर्य हरवले आहे. तर आपल्याला न्याय मिळेल असा आनंद दुसरीकडे व्यक्त होत आहे. मात्र, खरी काँग्रेस कोणाबरोबर आहे, हे या मेळाव्यानंतर समजेलच. ज्यांनी भरभरून दिले. त्यांना सोडून आपली मोठी ताकद आहे, असा कयास बांधण्याचा प्रयत्न करणारे उद्याच्या मेळाव्यानंतर स्पष्ट करतील. या घडामोडीने राजकीय वर्तुळात चर्चा जरी होत असली तरी परिस्थिती मात्र, फारशी बिघडलेली दिसत नाही. 
कराड हे राजकीय पटलावर एक जागृत तालुका म्हणून परिचित आहे. याठिकाणी अनेक दिग्गजांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. किंबहुना ती देश पातळीवर नेली. स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचा हा तालुका काँग्रेस धार्जीन म्हणून परिचित आहे. याठिकाणी अनेकांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली. यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, पी.डी.पाटील यांच्यासारखी दिग्गज मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. अशातच स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याची धुरा सांभाळली. मात्र, याच काँगे्रसला आत गळती लागली आहे. सर्वजण भाजपात डेरेदाखल होत आहेत. आपणाला काहीतरी मिळेल अशा आशेनेच यांच्या राजकीय वाटचाली सुरू आहेत. प्रेमलाकाकींच्यापासून कालअखेर आ. आनंदराव पाटील हे या घराण्याचे एकनिष्ठ म्हणून परिचित होते. मात्र, असे काय घडले की त्यांनी साथ सोडण्याच्या निर्णयावर जायचा निर्णय घेतला. मान-अपमानाचे नाट्य घडले असा त्यांचा आरोप आहे. मात्र, एवढ्या गोष्टीने नाना खचू शकत नाहीत. यामाग वेगळेच काहीतरी असेल अशा चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांचा उद्या मेळावा बोलवला आहे. याठिकाणी ते कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय जाहिर करणार आहेत. निर्णयापुर्वी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पुढील रणनिती आखल्याचेही समजते. 
उत्तरेत शिवसेनेचा झेंडा रातोरात खाली ठेवून काँगे्रसमध्ये दाखल झालेले धैर्यशील कदम यांनी पृथ्वीबाबांच्या मुख्यमंत्री काळात उत्तरेत विकासकामे झाली ती माझ्यामुळे झाली. मी इथला दावेदार आहे. असे ठणकावून सांगितले. किंबहुना पक्षानेही त्यांना उमेदवारी दिली आणि माझ्यामागे 58 हजार मतांचा गठ्ठा आहे. असा आव आणून भाजपात दावा सांगायला सुरूवात केली. प्रत्यक्षात मात्र, ही 58 हजार मते गेल्या अनेक निवडणुकात विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मते काँग्रेस विचारधारेची आहेत. ही कोणाच्या मालकीची नाहीत. हे मात्र, ते सोईस्कररित्या विसरले आहे. धैर्य हरवून काँग्रेसचा झेंडा आता खाली ठेवायचा आणि भाजपात जायचे ही त्यांची रणनिती काँगे्रस विचाराला पाईक सहन करणार आहे का? याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेल, मात्र त्याठिकाणी जावून त्यांना काय मिळणार आहे. हे उमजू शकले नसले तरी उमेदवारी मिळणे मात्र अशक्य आहे. वारंवार भाजपाचे नेते मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहिर करत आहेत. यामुळे कदमांच्या हाती जे मिळेल त्याची चर्चा मात्र मतदारसंघ चवीने करेल. पक्ष सोडणे ही त्यांची पहिली वेळ नाही. तर यापुर्वीचा त्यांचा इतिहास आहे. मात्र, आनंदराव पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेस पक्षापासून फारकत घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांना चव्हाण घराण्याने जे जे देता यईल ते ते देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची राजकीय कारकीर्द कशी असेल. ते पाहण्यासाठी तालुका सज्ज आहे.