कॉंग्रेसला राम राम करत धैर्यशीलांची पावले कमळाकडे

कॉंग्रेसला राम राम करत धैर्यशीलांची पावले कमळाकडे

कराड / प्रतिनिधी

      कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे मात्तबर नेते व वर्धन अॅग्रोचे सर्वेसर्वा धैर्यशील कदम हे अनेक दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये बेचैन होते. ते भाजपात जाणार अशी चर्चाही होती. मात्र मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, धैर्यशील कदम यांनी कॉंग्रेसला राम राम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर येत्या दोन- चार दिवसांत ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना घेरण्याचा डाव भाजपचा सफल होताना दिसत आहे. जयकुमार गोरे यांच्या प्रवेशानंतर धैर्यशील कदम भाजपात जाणार हे निश्चित होते. मात्र त्याचा मुहूर्त सापडत नव्हता. गणपत्ती बाप्पाचे आगमन त्यांना काय मिळवून देते, याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.                                                               कराड उत्तर मतदारसंघात आपले चांगले वर्चस्व निर्माण करत धैर्यशील कदम यांनी विधानसभेची २०१४ ची निवडणूक लढवली. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले. भाजपकडे असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून मनोज घोरपडे यांनी उमेदवारी केली. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम अशी तिरंगी ही निवडणूक झाली. या तिरंगी निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवत विजय मिळवला. मात्र, कॉंग्रेसकडून लढलेले धैर्यशील कदम हे दोन नंबरचे उमेदवार ठरले तर मनोज घोरपडे हे तीन नंबरवर गेले. या निवडणुकीच्या निकालापासून धैर्यशील कदम हे नाराज होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा हे जर उत्तरमध्ये सभा घेत होते, तर ही निवडणूक जिंकणे सोयीचे होते. मात्र मला कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी साथ केली नाही. तर सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन मी निवडणूक लढवली. कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद जसजसे वाढू लागले. तसतशी भाजपकडून जवळीक वाढू लागली. अशातच त्यांनी साखर कारखाना सुरु केल्याने त्यांना शासनाचे सहकार्यही अपेक्षितच होते.                  धैर्यशील कदम यांच्या वर्धन अॅग्रो या कारखान्यावर सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर यांनी भेट दिली. त्याचवेळी कदमांची पावले कमळाकडे पडू लागल्याचे दिसू लागले. त्यानंतर ना.चंद्रकांत दादा पाटील यांनीही या कारखान्यावर जाऊन भेट दिली. भाजपच्या कार्यक्रमाला धैर्यशील कदमांचे निकटवर्तीय कायम दिसायचे मात्र धैर्यशील कदम हे सावध पवित्रां घेत आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवत होते. गत विधानसभेच्या निवडणुकीनंतर नाराज धैर्यशील दादा हे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील व आ. जयकुमार गोरे यांच्यात सुरु असलेल्या राजकीय कलगी तुऱ्यात सातत्याने जयकुमार गोरे यांच्याबरोबर दिसू लागले. पर्यायाने ते गोरे गटाचे खंदे समर्थक म्हणून पुढे आले. अलीकडे वर्षभरात त्यांचा राबता सातत्याने गोरे व भाजपच्या नेत्यांबरोबर वाढतच होता. अशातच कराड उत्तरचा गड सर करायचा असेल तर धैर्यशील कदम-मनोज घोरपडे यांना एकत्रित आणल्याखेरीज कराड उत्तरची जागा जिंकणे सोपे नाही. भाजपने हा मतदारसंघ ना. शेखर चरेगावकर यांच्याकडे दत्तक दिल्यानंतर ते सातत्याने धैर्यशील कदम यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांची ही राजकीय खेळी यशस्वी होताना दिसत आहे.                                                                            कराड उत्तराचे पालकत्व स्वीकारल्यानंतर ना. चरेगावकर यांनी अनेक गणिते आखत आपल्या जाळ्यामध्ये छोट्यामोठ्या नेत्यांना सहभागी करून घेतले. ज्यांना अडचण वाटत होती, ते शिवसेनेकडे गेले. हे करत असताना युतीचा उमेदवार या मतदारसंघात कसा विजयी होईल, यावर बारीक लक्ष केंद्रित केले आणि अखेर धैर्यशील कदमांना खेचून घेण्यात ते यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत दादा पाटील व शेखर चरेगावकर यांची बैठक पार पडून धैर्यशील कदमांचा प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. कदमांची पावले कॉंग्रेसला रामराम करत कमळाकडे गेली हे निश्चित ! धैयशील कदम यांना प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील व ना.शेखर चारेगावकर यांनी कोणता शब्द दिला हे मात्र समजू शकले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे हे उत्तरचे उमेदवार असतील असे जरी चंद्रकांत दादा यांनी जाहीर केले असले तरी धैर्यशील कदमांच्या भाजप प्रवेशाने गणिते बदलू शकतात. या राजकीय खेळीने विद्यमान आमदारांची मोठी कोंडी झाल्याचे स्पष्ट होत आहे.                                                                        कराड उत्तर मतदारसंघ हा चार तालुक्यांत विखुरला असल्याने एकीकडे शिवेंद्रराजे भोसले, मनोज घोरपडे आणि आता धैर्यशील कदम अशी भाजपची एकत्रित ताकद विद्यमान आमदारांच्या विरोधात लागणार आहे. आ. बाळासाहेब पाटील ही राजकीय कसोटी कशी पार पाडतात हे पाहणे महत्वाचे आहे. एकास एक असा सामना कराड उत्तरामध्ये झाल्यास उत्तरेत भाजप आपली ताकद दाखवणार हे मात्र निश्चित !