ज्योतिरादित्य सिंधियांचा राजीनामा 

सिंधिया यांना डावलून कॉंग्रेसने कमलनाथ यांना पुन्हा संधी दिल्याने ज्योतिरादित्य कॉंग्रेस श्रेष्ठींवर नाराज होते. या नाराज ज्योतीरादित्यांचा राजकीय वापर व पुनर्वसन भाजप कसे करणार हे पाहावे लागेल. ज्योतिरादित्य सिंधिया आता मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकारला धक्का देऊन भाजपचे सरकार स्थापन करणार की काय आणि त्यांचे त्या सरकारमध्ये कोणते स्थान असणार हे देखील काही दिवसांत पहावयास मिळणार आहे.                                                         

 ज्योतिरादित्य सिंधियांचा राजीनामा 

संपादकीय / अग्रलेख 

 ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ते आपल्या वडिलांप्रमाणे स्वतंत्र पक्ष काढणार की भाजपमध्ये सामील होणार हेही लवकरच समजेल. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कुटुंबातील बहुसंख्य सदस्य भाजपशी संबंधित आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांची आजी राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी १९५७ मध्ये काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आणि त्यानंतर १९६७ साली त्यांनी तत्कालीन जनसंघात प्रवेश केला. मात्र विजयाराजे यांचे पुत्र माधवराव सिंधिया (शिंदे ) हे आणीबाणीनंतर कॉंग्रेसमध्ये गेले. नंतर राजमातांनी मुलगी वसुंधरा राजे सिधियांना भाजपमध्ये आणले. त्यानंतर त्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीही होत्या. ज्योतिरादित्य यांची एक आत्या यशोधरा या भाजपमधून पाचवेळा आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत. तर भाजपची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यामुळे विशेष आश्चर्य नाही. तूर्तास त्यांनी मध्यप्रदेशातील ६ मंत्र्यांसह १९ आमदारांना कर्नाटकातील एका रिसोर्टवर अज्ञातवासात ठेवल्याचे समजते. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी  ट्विटरवर काँग्रेस पक्षाचा राजीनामा पोस्ट केला आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांनी ट्विटरवरून कॉंग्रेसचे चिन्ह काढून टाकले होते. त्यावेळीही त्यांच्या राजीनाम्याची चर्चा चर्चा सुरु झाली होती. त्याचवेळी ज्योदिरादित्य सिंधिया कॉंग्रेसला पर्यायाचा विचार करत होते, हे स्पष्ट झाले होते. त्यांचे जवळचे मित्र राहुल गांधी यांच्याशी झालेली फारकतही कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास कारणीभूत मानली जात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. परंतु सिंधिया यांना डावलून कॉंग्रेसने कमलनाथ यांना पुन्हा संधी दिल्याने ज्योतिरादित्य कॉंग्रेस श्रेष्ठींवर नाराज होते. या नाराज ज्योतीरादित्यांचा राजकीय वापर व पुनर्वसन भाजप कसे करणार हे पाहावे लागेल. ज्योतिरादित्य सिंधिया आता मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकारला धक्का देऊन भाजपचे सरकार स्थापन करणार की काय आणि त्यांचे त्या सरकारमध्ये कोणते स्थान असणार हे देखील काही दिवसांत पहावयास मिळणार आहे.                                                                                                  पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून तात्काळ काढून टाकत असल्याचा निर्णय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ट्वीटरवर जाहीर केला आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराज होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिले गेल्याने सिंधिया यांची नाराजी अनेकवेळा उघडपणे समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर सिंधिया यांना मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया स्वतःचा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देतात की भाजपात थेट प्रवेश करणार हे काही दिवसांत समजेलच. मध्य प्रदेशातल्या विधानसभेत एकूण २२८ आमदार असून त्यापैकी दोन जागा संबंधित आमदारांचे निधन झाल्याने रिक्त आहेत. काँग्रेसकडे ११४ संख्याबळ असून भाजपकडे १०७, उर्वरित ९ आमदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे २, समाजवादी पक्षाचा १ तर ४ अपक्ष आमदार आहेत. ही निवडणूक जिंकण्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र सत्ता आल्यानंतर डावलले गेल्याने नाराज सिंधिया यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंग या दोघांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना कधीच महत्व दिले नव्हते. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर  मुख्यमंत्रीपद सिंधियांकडे दिले जाईल, अशी चर्चा होती, मात्र कमलनाथ मुख्यमंत्री झाले. तसेच मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही सिंधिया यांना देण्यात आले नव्हते. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला राम राम केला. खरे तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवा नेत्यांची मोठी फळी तयार झाली आहे. कॉंग्रेसची पुनर्बांधणी करायची असेल तर युवा नेतृत्वाला मोठा वाव मिळाला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी अनेकवेळा पक्ष कार्यकारिणीमध्ये सांगितले आहे. परंतु अजून जुने नेते सत्तेच्या लोभात आहेत, याचाच थेट नकारात्मक परिणाम युवा नेत्यांच्या मानसिकतेवर होत आहे. तसेच राहुल गांधी यांनी कॉंग्रेसमधील जबाबदारी केव्हाच नाकारली आहे. त्यामुळे राहुल यांच्याजवळील युवा नेत्यांची फळी इतस्तत: विखुरली जाणार की काय, अशीही शंका निर्माण होऊ लागली आहे.                                           ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनाम्यानंतर सिंधिया हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून भोपाळमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार आहेत. हा लेख लिहिण्यापूर्वी ते भाजपमध्ये एव्हाना दाखलही झाले असतील. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी ही आपली नवी सुरुवात असल्याचे म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ एकमेकांच्या समोर आले असता आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची धमकी ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांना दिली होती. यावर, जे करायचंय ते करा अशा शब्दांत कमलनाथ यांनी प्रत्यूत्तर दिले होते. आता हे शीतयुद्ध उघड युद्धात रुपांतरीत झाले आहे आणि कमलनाथ यांना मध्यप्रदेशातील कॉंग्रेसमधील एकाधिकारशाही भवितव्यात चांगलीच महागात पडू शकते. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले परंतु त्यांना  डावलण्यात आले. राजस्थानमध्ये राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणूक २०१९ च्या गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कमलनाथ व सिंधिया यांच्यातील संबंध ताणले गेले होते. याची तक्रार कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्याकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे करण्यात आली होती. सिंधिया यांच्या नव्या भूमिकेमुळे कमलनाथ यांचे काँग्रेस सरकार कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार बनवण्यात यशस्वी ठरले तर भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होऊ शकतात. ज्योतिरादित्य सिंधिया यांना कदाचित राज्यसभा सदस्यत्व किंवा उपमुख्यमंत्रीपदीपद देण्यात येईल. परंतु त्यावर ते समाधान मानणार का, हा प्रश्न निरुत्तर राहतोच. पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी सिंधिया यांना नेमके कोणते आश्वासन दिले आहे, यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.