नागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..!

वेळ कोणावरही येऊ शकते सावधानता बाळगा...

नागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..!

नागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..!

वेळ कोणावरही येऊ शकते सावधानता बाळगा...

अनिल कदम/उंब्रज

रेमडीसीविर,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर आणि बेड या चार शब्दव्यतिरिक्त कोरोना महामारीच्या काळात दुसरा कोणताही शब्द कानावर पडत नाही.तरी सुद्धा नागरीक भाजी,तेलडबा,किराणामाल अशी थातुरमातुर कारणे सांगून घराबाहेर पडायचे धारिष्ट करीत आहेत.माझ्या एकट्यामुळे काय होतंय हा फाजील आत्मविश्वास कोरोना महामारीचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरत आहे.परंतु नात्यातील अथवा घरातील व्यक्ती कोरोनाबधित झाल्यावर काहींच्या डोक्यात प्रकाश पडत असून बैल गेल्यावर झोपा करण्यापेक्षा वेळीच सावध झाले तर समाजासह व्यक्तिगत नुकसान वाचवता येऊ शकते.

जिल्हा माहिती कार्यालय दररोज कोरोनाबधित नागरिकांची आकडेवारी जाहीर करीत असते गेल्या काही दिवसांपासून सतत बधितांचा आकडा हा दोन हजारांच्या वरून आहे तर मृतांचा आकडा हा चाळीस च्या दरम्यान आहे काल तर जिल्ह्यात ५८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यापैकी १७ जण हे कराड तालुक्यातील आहेत.यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन प्रशासनाच्या सूचना पाळणे गरजेचे असून पोलीस व वैद्यकीय सेवांवरील ताण वाढत असून त्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे.

सध्या रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा असून एचआरसिटी स्कोर जास्त असणाऱ्या रुग्णांना या औषधांची कमतरता जाणवत आहे ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असून अत्यंत नियोजनबद्ध वापर करून ऑक्सिजन पुरवावा लागत आहे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसून ऑक्सिजन बेड सुद्धा हाऊसफुल्ल झाले आहेत यामुळे वाढते रुग्ण आणि मर्यादित वैद्यकीय यंत्रणा यांचा ताळमेळ बसवताना प्रशासनाची दमछाक होत असून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.

सगेसोयरे,आप्तजन,मित्रमंडळी कोरोनाबधित होऊन भीषण संकटाचा सामना करण्यापूर्वी सावध व्हा विनाकारण घराबाहेर पडू नका संपत्ती नव्याने निर्माण होऊ शकते परंतु गेलेले जीव आणि यामुळे झालेले नुकसान कितीही संपत्ती ओतली तरी पुन्हा निर्माण होणार नाही यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे असून आपल्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास होऊ नये  सद्याच्या घडीला हीच खरी मदत असून घरीच राहा,सुरक्षित राहा मास्क ,सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करा आणि महाराष्ट्राची संकटाचा सामना करण्याची परंपरा कायम राखा.