देशात लोकशाही राहणार की ठोकशाही - पृथ्वीराज चव्हाण

देशात लोकशाही राहणार की ठोकशाही - पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 

                        काश्मीरमधून स्थानिक जनतेला हाकलून द्यायचे हे आरएसएसचे धोरण आहे. जर पंडित नेहरू नसते; तर जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले नसते. एकीकडे जम्मू-काश्मीरचे 370 कलम काढायचे. मात्र, दुसरीकडे नागालँडसारख्या राज्याच्या कराराकडे दुर्लक्ष करायचे. सरकारचे जनतेला अंधारात ठेवून त्यांची दिशाभूल करायचे काम चालू असून लोकांना भविष्याच दिसत नसून आता या देशात लोकशाही राहणार की ठोकशाही असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. 

                      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा जनादेश यात्रेदरम्यान केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी सोमवारी 16 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवराज मोरे नगरसेवक इंद्रजित गुजर, राहुल चव्हाण आदी. उपस्थित होते. 

                    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देश सध्या मोठ्या आर्थिक मंदीत सापडला आहे. अशा परिस्थितीत देशात कोणकोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली, किती नवे उद्योग आणले, त्यामध्ये किती जणांना रोजगार मिळाला, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. मात्र, तसे न करता ते केवळ खोटी आकडेवारी जाहीर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जिल्हावार माहिती द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.