लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला रोखा

लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला रोखा

कराड/प्रतिनिधीः

काँग्रेसची लोकशाही पद्धतीने तब्बल २२ वर्षानंतर पक्षांतर्गत निवडणुक झाली. आम्ही तशी मागणी लावून धरली नसती तर  कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या. पण आता नवे अध्यक्ष खरगे हे चांगलं काम करतील. नजिकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्याला व २०२४ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान ँकाँग्रेस समोर आहे. त्याचा अभ्यास करूनच यापुढील वाटचाल होईल. 

२०२४ च्या निवडणूकीत लोकशाही टिकवण्यासाठी मोदींचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येवून ही निवडणूक लढवली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करत राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. त्यामुळे ते केव्हाही कोसळू शकते. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण आदींची उपस्थिती होती.काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे ’जी 23’ चा हेतू सफल झाला आहे. पण निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच आता नवे अध्यक्ष पक्षांतर्गत लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. 
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत आहे. भारत जोडो यात्रा म्हणजेच मोदी हटाव यात्रा आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत विषारी वातावरण राहणार आहे. म्हणूनच बदल गरजेचे आहेत. त्यासाठी येऊ घातलेल्या निवडणुका जिंकाव्याच लागतील असेही चव्हाण म्हणाले.

सन 2014 साली राज्यातलं आमचं सरकार पाडलं नसतं तर पुन्हा आमचंच सरकार सत्तेत आलं असतं. राज्यात फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे हे सर्वांना माहीत आहे अशी टीका नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली.महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यात सहभागी होणार का? याबाबत विचारतात चव्हाण म्हणाले, त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायची की नाही हा त्यांचा निर्णय राहील. राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवर एकमत होत नाही. त्यांच्यात अंतर्गत मोठा कलह आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही. असे मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नावर व्यक्त केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेला राजकीय शिरकाव बरोबर नाही. खरंतर तेथे खेळाडूंनाच संधी मिळायला पाहिजे. पण आज पैशाच्या जोरावर कोणीही तिथे जात आहे. हे बरोबर नाही असे मतही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.