ग्रा.प.साठी मुदतवाढीसह ऑफलाईन अर्ज स्विकारा - पंजाबराव पाटील
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, सर्व्हर डाऊनमुळे इच्छुक उमेदवारांची गोची, अन्यथा आंदोलनाचा इशारा
कराड/प्रतिनिधी :
राज्यात ग्रामपंचायतीचा बिगुल वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावाधाव सुरु आहे. मात्र, ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना सर्व्हर डाऊनमुळे इच्छुक उमेदवारांची गोची होत आहे. त्यामुळे अनेकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार असून प्रशासनाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊन ऑफलाईन अर्जही स्विकारावेत. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना सर्व्हर डाऊनमुळे इच्छुकांवर उमेदवारीपासून वंचित राहण्याची वेळ आल्याच्या मुद्यावर पंजाबराव पाटील यांनी मंगळवारी 29 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीसाठी मुदतवाढीसह ऑफलाईन अर्ज स्विकारावेत, अशी मागणी केली.
ग्रा.प. सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 असा कालावधी देण्यात आला आहे. आता बुधवारी 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस राहिला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी धांदल होणार आहे. त्यात उमेदवारी अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. तसेच दाखले मिळाल्यानंतर अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. परंतु, त्याठिकाणी सर्व्हर स्लोव असल्याने दिवसभरात केवळ चार-पाच अर्ज दाखल होत आहेत. मात्र, जिल्ह्यात उमेदवारांची संख्या हाजारोत असल्याने अर्ज भरण्यापासून वंचित राहणाऱ्या उमेदवारांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करून अर्ज भरण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ द्यावी. तसेच ऑफलाईन अर्जही स्विकारण्यात यावेत. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.