हुकूमशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचा भाजपचा कट - आ. पृथ्वीराज चव्हाण

हुकूमशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचा भाजपचा कट - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 
                        महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या, याला सरकारच जबाबदार आहे. तसंच शेतकऱयांच्या कर्जमाफीच काय झालं? व हे सरकार कोणतीही योजना पूर्ण करताना दिसत नाही. कारण या सरकारला भावनिक विषय पुढे आणून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून जनतेची दिशाभूल करायची आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सरकारचे बरेच घोटाळे बाहेर काढले. परंतु सरकारने संबंधित मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात धन्यता मानली आहे. समृद्धी महामार्ग निर्णय होण्याआधीच भाजप व मुख्यमंत्र्यांच्या जवळच्यानी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सध्या राजकीय पातळीवरील घडामोडी पुढे दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यामुळे येन-केन प्रकाराने हे सरकार हुकूमशाही करीत विरोधी पक्ष संपविण्याचे कट कारस्थान करीत आहे. असे आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करत भाजप सरकारवर जोरदार आसूड ओढले.   
                    मुंबई येथील कोपरखैराणे येथील शेतकरी समाज हाॅलमध्ये आयोजीत केलेल्या मुंबईस्थित कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक अध्यक्षस्थानी होते. माजी उपमहापैर रमाकांत म्हात्रे, येवतीचे शिवाजीशेठ देसाई, ठाणे जिल्हा काँग्रेसचे  सतीश पाटील, ठाणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप पाटील, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब थोरात, उद्योजक वसंतराव चव्हाण, सुरेश संकपाळ, ईशान्य मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा सुर्यवंशी, राजश्री हणमंतराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा माने, कराड दक्षिण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, पैलवान नानासाहेब पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात-सवादेकर,युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहूल चव्हाण, डॉ. सचिन कोळेकर, संदीप रंगाटे, झाकीर पठाण, आदिल मोमीन, महेश देसाई, नाना काजारी आण्णा साहेब जाधव, बापुराव काटेकर, पिंटू शेवाळे, दत्ता गुरव, धनाजी देशमुख, अँड. राम होगले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
                  आ. चव्हाण म्हणाले, उंडाळे प्रादेशिक योजनेत 17 गावांना पाणीपुरवठा योजना पूर्ववत केली आहे. कराड ते ढेबेवाडी चौपदरी रस्ता उत्कृष्ठपद्धतीचा करता आला. ज्यामुळे आज मुंबईमध्ये स्थायिक होणाऱयांचा ओघ थांबून लोक गावाकडे राहूनच नोकरीसाठी कराडला येत आहेत. इतकं चांगलं दळणवळण करता आल्याचे समाधान वाटते. 2014 नंतर आता पर्यंत 71 हजार कोटींचे घोटाळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये झाले. घोटाळे बहादरांचे नांव मोदी सरकारने जाहीर करावे, हे माझे आवाहन मोदींनी अजूनही पूर्ण केलेले नाही. सरकारचे अर्थव्यवस्थेवर नियंत्रण नाही. रिझर्व्ह बँकेतील स्वायत्तता टिकवण्यासाठीच्या रक्कमेतील 1 लाख 76 हजार कोटींची रक्कम सरकारने देश चालविण्यासाठी उचलली आहे. 
                   ते म्हणाले, छत्रपतींचे किल्ले सरकारने भाड्याने देवून परिसीमाच गाठली आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आज छोटे उद्योजक धोक्यात आले आहेत. आज लोकांना हे भाजप सरकार गृहीत धरून सगळे निर्णय घेत आहे. हा त्यांचा चुकीचा भास आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत. येत्या दोन दिवसात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा होईल. आता आपणही एकत्र येण्याची गरज आहे.  ज्या मतदारांनी मला तीनवेळा खासदार केले, त्यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. याच माझ्या कराडच्या जनतेसाठी मला 1800 कोटींपेक्षा जास्त निधी आणता आला. हे मी मुख्यमंत्री झालो म्हणूनच शक्य झाले. 
                    ते पुढे म्हणाले, कराड दक्षिणमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांचे नारळ आम्ही फोडले आहेत. दुसऱ्यांच्या कामांचे क्रेडीट आम्ही कधी घेत नाही. व कधी घेण्याची गरजही पडणार नाही. कोणत्यातरी मंत्र्यांच्या मागे फिरून कामे होत नसतात. असा असा टोला त्यांनी नांव न घेता अतुल भोसलेंना लगावला. कोल्हापूर व सांगलीला नुकताच पूर आला. त्यावेळेस तर दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री गायब होते. व त्यावेळी हे मुख्यमंत्री जनादेश यात्रेत फिरून मते मागत होते. काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. मोठया पदावर नेऊन बसवले. यामुळेच माझ्यासारखा शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला. 
                    माझ्या काळात निधी देताना कधीच महाराष्ट्रात दुजाभाव केला नाही. आमची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी संघर्ष केलेली पिढी आहे. आमच्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत लढा दिला होता. त्यामुळे अखंड महाराष्ट्र रहावा, हे आमचे तत्व आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी कधीही दुजाभाव केला नव्हता. पण हे सरकार आज हा दुजाभाव करीत आहे. जे महाराष्ट्राच्या हिताचे अजिबात नाही. हा विचार संपवला पाहिजे. या जुलमी भाजप राज्यकर्त्यांना आपल्या राज्यातून हद्दपार करा. अनिल कौशिक, शिवाजीशेठ देसाई, अजितराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.