‘आय लव्ह कराड’च्या प्रेमात तरुणाई चिंब

कराड/प्रतिनिधी :
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत कोल्हापूर नाका येथील शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्वागत कमानीलगत नुकतेच ‘आय लव्ह कराड’ ही आकर्षक प्रतिकृती बसविली आहे. ही प्रतिकृती एक सेल्फी पॉईंटच बनला असून सोशल मिडियावर त्याला सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसून येत आहे. ही प्रतिकृती बनविण्यासाठी पालिकेला सुमारे 7 लाख रूपये इतका खर्च आला आहे. या सेल्फी पॉईंट चांगलाच लोकप्रिय झाला असून शहरासह तालुक्यातील तरुणाईही ‘आय लव्ह कराड, सेल्फी पॉईंटच्या प्रेमात चिंब भिजली असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पालिकेने शहराच्या सुशोभिकरणात भर पडावी व शहराला एक वेगळेच नावलौकिक प्राप्त व्हावे, या उद्देशाने शहरात अनेक ठिकाणी रंगीत पाण्याचे कारंजे, उद्याने, रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड, सेल्फी पॉर्इंटची निर्मिती केली आहे. यातील महत्वाच्या तीन सेल्फी पॉईंटचे गत आठवड्यात लोकार्पण करण्यात आले. त्यामधील पंचायत समितीसमोरील आकर्षक कारंजे, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथील रशियन बनावटीचे विमान व रणगाडा आणि कोल्हापूर नाक्यावरील ‘आय लव्ह कराड सेल्फी पॉईंटचा यात समावेश आहे.