कोरोना लसीच्या निमित्ताने… 

कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल, हा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा ( आयसीएमआर ) दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी, यासाठी हा आटापिटा आहे काय ? याचे  आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचे लॉन्चिंग करण्याचा काय मतलब आहे, तो केंद्र सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे.               

कोरोना लसीच्या निमित्ताने… 

केंद्र सरकारचे राजकारण

कृष्णाकाठ / अशोक सुतार 

         केंद्र सरकारचे सध्या काय सुरु आहे ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात अनेकवेळा येतो. कारण केंद्र सरकराला कोरोनाची परिस्थिती कमी करता आलेली नाही. लॉकडाऊनपूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली होती. सध्या तर अर्थव्यवस्था थंडावली आहे, असे सर्व प्रतिकूल चिन्ह दिसत असताना अनेक प्रसारमाध्यमे केंद्र सरकार हे करणार, ते करणार अशा बाता मारीत असल्याचे दिसत आहे. मोदीभक्त तर मोदींच्या निर्णयाला विरोध करणाऱ्याला मोठ्या संख्येने समाजमाध्यमांवर ट्रोल करताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमीच केंद्र सरकारला कधी सल्ला देतात तर कधी चुकीच्या धोरणावरून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे पृथ्वीराज बाबा हे नेहमीच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतात. पृथ्वीराज बाबा कराडला लॉकडाऊनमध्ये होते. त्यावेळीही ते केंद्र सरकारला एक सल्ला दिला म्हणून राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. बाबांनी केंद्र सरकारला देशातील मंदिरांच्या ताब्यात असलेले सोने गहन ठेवून कोरोना काळात देशासाठी पैसा उभारण्याचा सल्ला दिला होता. यामुळे लॉकडाऊनमध्येही बाबा देशभर चर्चेत आले होते. बाबांनी मांडलेल्या मुद्द्याला कोणी विरोधही करू शकत नव्हते, एवढा तो बिनतोड मुद्दा होता. आता पंतप्रध नरेंद्र मोदींनी कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल, असे जाहीर केले आहे. या मुद्द्याची चांगली पोलखोल पृथ्वीराज बाबांनी केल्यामुळे ते पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. पृथ्वीराज बाबांनी आपल्या ट्विटवर एक ट्विट करत म्हंटले आहे की, कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल, हा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा ( आयसीएमआर ) दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी, यासाठी हा आटापिटा आहे काय ? याचे  आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचे लॉन्चिंग करण्याचा काय मतलब आहे, तो केंद्र सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे.                                                                     देशात कोरोनाची लस अजून निर्माण केली गेलेली नाही किंवा इतर प्रगत देशांतही अशी हमखास लस बनवण्यात आलेली नाही. त्यामुळेच अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशात लाखो लोक कोरोना महामारीमुळे मृत्यू पावले आहेत. कोरोना महामारीला कायमचे हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू. एच. ओ. ) अजूनही प्रयत्नशील आहे. परंतु यश मिळालेले नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर हेच बर्यापैकी उपाय आहेत. असे असताना केंद्र सरकार कोरोनावर लस शोधून काढल्याचे जाहीर करत आहे, हे योग्य नव्हे. त्या लसीची चाचणी (ट्रायल) अजून सुरु असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मानवी चाचण्यांबद्दल केंद्रीय आरोग्य खात्याला पत्र पाठवल्याचे म्हटले जात आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिव डॉ. प्रीती सुदान यांनी म्हटले आहे की, हे पत्र आयसीएमआरने लिहिल्यामुळे लसीबद्दल तेच काय ते सांगू शकतात. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव याबाबत काहीही बोलत नाहीत, हे विशेष आणि आक्षेपार्ह आहे. दि. १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस तयार केली जाईल, असा दावा आयसीएमआरने केला आहे. आयसीएमआरचा दावा अवास्तव असल्याचे कॉंग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी योगगुरू रामदेव बाबांनी आपण कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला होता. त्यांच्यावर केंद्र सरकारने गुन्हा दाखल केला आहे. कारण मानवी चाचण्या केव्हा केल्या, औषध बनवण्याची पद्धत कोणती इ. सर्व माहिती पतंजलीचे रामदेव बाबा किंवा आचार्य बाळकृष्ण देऊ शकले नाहीत. एखादे औषध वा लस याची जाहीर वाच्यता करण्यापुर्वी किंवा जाहिरात करण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य खात्याचे सर्व नियम पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा असे संशोधन अवास्तव किंवा चुकीचे ठरते. कोरोना किंवा नव्या उद्भवलेल्या महामारीची लस यायला दीर्घ काळ लागतो. त्यावर संशोधन, शास्त्रीय चिकित्सा, कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रत्येक देश युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे, तरीसुध्दा लस प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी अजून किमान ७ महिने लागण्याची शक्यता आहे. भारतात फेब्रुवारी – मार्च दरम्यान कोरोनाची महामारी आली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर लस बनवायची म्हटले तर किमान १०० जणांवर (त्यापूर्वी त्याचे शास्त्रीय विवेचन, घटक, पद्धत इ. माहिती ) चाचणी करणे गरजेचे असते. त्यामुळे केंद्र सरकार स्वातंत्र्यदिनीचे (१५ ऑगस्ट या दिवशी ) निमित्त का शोधात आहे ? कदाचित स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्ली राजधानीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना, कोरोना लस शोधल्याचे ऐतिहासिक आश्वासन देण्याची देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आ. पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला नेमके या मुद्द्यावरून कोंडीत पकडले आहे. यातून केंद्र सरकारची स्वत:ची टिमकी वाजवण्याची वृत्ती दिसून येते, असे पृथ्वीराज बाबांना दाखवून द्यायचे आहे. यात काहीही खोटे नाही. प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेले आश्वासन हे नेहमीच ऐतिहासिक किंवा यापूर्वी कोणत्याही सरकारने केलेले नसते, ते अभूतपूर्व असते, असे देशवासियांना दाखवले जाते. त्यासाठी नेमका इव्हेंट केव्हा शोधायचा, हे देखील ठरलेले असते. धन्य ते सत्ताधारी आणि धन्य तो देश, असे जगातील सर्व देशांनी म्हटले पाहिजे, याचा आटापिटा केंद्र सरकार करत असल्याचे नेहमी दिसते. परंतु देशातील नागरिकांना आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांचे हे वर्तन ज्ञात झाले आहे.                                                                                                            देशात कोरोना महामारीमुळे जाहीर केलेला लॉकडाऊन उठला पाहिजे, ट्रेन सुरु झाल्या पाहिजेत, व्यवसाय सुरु झाले पाहिजेत अशी लोकांकडून आग्रहाची मागणी आहे हे मान्य आहे, पण इथे आरोग्याचाही प्रश्न आहे हे पाहून सुवर्णमध्य शोधला पाहिजे, असे मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. भारताचे चीनबरोबरचे संबंध सिमाप्रश्नावरून बिघडले असून दोन्ही देशांत तणाव आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवर चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यावर केंद्र सरकारने म्हटले होते की, चीनने आपल्या प्रदेशात घुसखोरी केलीच नाही. यातून केंद्र सरकारचे मलूल धोरण दिसून आले. त्यानंतर केंद्र सरकारने चीनवर थेट कारवाई करण्यापेक्षा ५९ चीनी मोबाईल अॅ पवर बंदी घालण्याची कारवाई केली. खरेतर केंद्र सरकारने चीनला अशा प्रकारे गुळमुळीत उत्तर देणे अपेक्षित नव्हते. या पार्श्वभूमीवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, मोबाईल द्वारा विविध अॅपमधील ३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅसपदेखील बंद केले पाहिजे, अशीही मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने ( आयसीएमआर ) ने १५ ऑगस्टपर्यंत  कोरोनावर लस तयार होईल असे म्हणणे म्हणजे राजकारण्यांच्या आश्वासानासारखे आहे. खरे तर, कोरोनाची लस शोधली असेल तर तीन वेळा त्याची चाचणी झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी अजून तीन महिने जावे लागतील. परंतु आयसीएमआरला केंद्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत लस शोधली आहे असे सांगण्यास दबाव टाकला आहे काय, असा संशय येत आहे. कॉंग्रेस हा देशातला सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा त्यांना मूलभूत अधिकार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे देणे सरकारची जबाबदारी आहे. चर्चा झाली पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. अन्यथा सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही वाढायला नको.