इंदापूर शहरातील कॅफे हाऊस मध्ये चालतंय काय...?

पालकांनी विद्यार्थ्यांवरती बारकाईने लक्ष देण्याची गरज..!!

इंदापूर शहरातील कॅफे हाऊस मध्ये चालतंय काय...?

इंदापूर शहरातील कॅफे हाऊस मध्ये चालतंय काय...?

पालकांनी विद्यार्थ्यांवरती बारकाईने लक्ष देण्याची गरज..!!


जितेंद्र जाधव
इंदापूर/प्रतिनिधी:-

इंदापूर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर म्हणून सर्वश्रुत परिचित असलेले शहर आहे. परंतु याच शहरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाश्चात्य देशातील कॅफे हाऊस ही संकल्पना रुजू लागली आहे. मात्र या कॅफे हाऊस मध्ये नेमके चालते तरी काय..? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून या कॅफे हाऊस मध्ये सर्रास वावरणाऱ्या विद्यार्थ्यावरती पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.

इंदापूर शहरांमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात "कॅफे हाऊस' ही संकल्पना रुजू लागली आहे.शहरात महाविद्यालयांच्या परिसरात व मोक्याच्या ठिकाणी अर्धा डझन पेक्षा जास्त कॅफे हाऊस कोणतीही परवानगी नसताना उघडपणे चालू आहेत. या कॅफे हाऊस मध्ये येणाऱ्या ग्राहकांना एकांतात बसण्यासाठी सुसज्जय व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कॅफे हाऊस च्या बाहेरील बाजूस काळ्या काचा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना आतमध्ये काय चालले आहे हे किंचितही दिसत नाही.

तसेच या कॅफे हाऊसमध्ये पडदे लावून पार्टिशन केलेल्या जागेत विविध ठिकाणी शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले एकांतात बसून असभ्य वर्तन करत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कॅफे हाऊस मध्ये खाणे पिण्याचे दर वेगळे व निवांत गप्पा मारण्यासाठी वेगळ्या जागेचे दर वेगळे असल्याची चर्चा आहे.यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलांना निवांतपणे गप्पा मारता येतील असा व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा कॅफे हाऊस मध्ये जाण्याकडे शिक्षण घेत असलेल्या मुलांचा कल अधिक वाढला असून कॅफे व्यवसाय तेजीत आला आहे.

कॉलेजचे विद्यार्थी बऱ्याचदा लेक्चर बुडवुन मित्र-मैत्रीणी सह फिरत असतात. आता याचा प्रभाव अल्पवयीन शालेय मुंलावर देखील पहायला मिळत आहे. कारण या कॅफेमध्ये फक्त कॉलेजमधीलच नाही तर शाळेतील अल्पवयीन मुले येत आहेत. बऱ्याचदा ही मुले शाळेच्या गणवेशातच या कॅफेत येत असल्याचे दिसून येत आहे. कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने याचे गंभीर परिणाम पहायला मिळत आहेत. मुलांमध्ये एकमेकांचे अनुकरण करण्याची स्पर्धा लागल्याते दिसत आहे. त्यामुळे अशा मुलांकडे पालकांनी तात्काळ बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

कारवाई होऊनही "कॅफे हाऊस' चालकांची मुजोरी कायम...!!

इंदापूर शहरात अनाधिकृतपणे चालत असलेल्या कॅफे हाऊस वरती इंदापूर पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली आहे. अनेकदा कॅफे हाऊस तात्काळ बंद करा असे आदेश दिले आहेत.मात्र अनाधिकृतपणे कॅफे हाऊस चालवणारे चालक कारवाई होऊनही कॅफे हाऊस बंद करताना दिसत नाहीत.उलट कॅफे हाऊस मध्ये अधिक सुख सुविधा उपलब्ध करून देण्याची स्पर्धा लागली असून कॅफे हाऊस चालकांची मुजोरी मात्र कायम आहे.


गेल्याच महिन्यात अकलूज मधील ती घटना..!!

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील एका कॅफे हाऊस वर अचानक धाड टाकून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या १६ तरुण -तरुणीवर अकलूज पोलिसांनी कारवाई होती.अकलूज पोलीसांनी एका कॅफे हाऊस वर धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी  अनेक तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले होते.दरम्यान अकलूज पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाई मुळे अनेक कॉफी हाऊस चालवणाऱ्या चालकांच्या मुसक्या आवळल्या होत्या.