जनता कर्फ्यूमुळे सातारा जिल्हा लॉकडाऊन

जनता कर्फ्यूमुळे सातारा जिल्हा लॉकडाऊन
जनता कर्फ्यूमुळे सातारा जिल्हा लॉकडाऊन

कराडातील रस्ते, बाजारपेठा ओस, ग्रामीण भागातही शुकशुकाट 

कराड/प्रतिनिधी : 
          जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण झाल्याने जगभरातील आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा हजारो जणांना संसर्ग झाला असून हळूहळू त्याचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे देशातील वाढता संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी लागू केलेल्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. 
           सरकारच्या या आवाहनाला शहरातील नागरिकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला असून ग्रामीण भागातही लोकांनी कडकडीत कर्फ्यू पाळल्याचे दिसून आले. त्यामुळे गावातील रस्त्यांवरही कमालीचा शुकशुकाट असल्याचे दिसून आले. 
         कोरोना हा संसर्गजन्य आजार असून काही तासांमध्ये त्याच्या विषाणूंची लाखो पटीने निर्मिती होत आहे. सध्यातरी या संसर्गजन्य आजारावर कोणताही ठोस औषध-उपचार उपलब्ध नसल्याने या रोगाची लोकांनी मोठे धास्ती घेतली आहे. मात्र, या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतल्यास त्याचा फैलाव रोखता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 रोजी देशात जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी पहाटेपासून देश, राज्यासह जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही लोकांनी कडकडीत कर्फ्यू पाळल्याचे दिसून आले. या जनता कर्फ्यूमुळे शहरी भागातील रस्ते, बाजारपेठा ओस पडल्या होत्या. तसेच ग्रामीण भागातही लोकांनी या कर्फ्यूला प्रतिसाद दिला असून येथील रस्त्यांवरही कमालीचा शुकशुकाट असल्याचे दिसून आले. 
        कराड ही मोठी बाजारपेठ असून हे शैक्षणिक, आरोग्य, व्यवसायिक केंद्र असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असल्याचे दिसून येते. तसेच शहरातून आशियाई मार्गासह काही प्रमुख राजमार्ग व महत्त्वाचे जिल्हामार्गही जात असल्याने कराड हे वाहतुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे केंद्र बनले आहे. तसेच शहरालगत रेल्वेस्थानक असल्यानेही शहराच्या वर्दळीत मोठी भर पडल्याचे दिसून येते. 
        मात्र, रविवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनता कर्फ्युमुळे येथील बाजारपेठा, बस स्थानक, मंडई परिसर, शहरातील मुख्य चौक व नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर चिटपाखरूही न फिरवल्याने संपूर्ण शहर अक्षरशः ओस पडल्याचे चित्र दिसून आले. परंतु, या कर्फ्युतून शासकीय आदेशानुसार अत्यावश्यक सेवा म्हणून शहरातील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयासह येथील बहुतांशी खाजगी हॉस्पिटल्स, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स सुरु ठेवण्यात आली होती. 
          कराडसह येथील सैदापूर, वारूंजी, विजयनगर, मलकापूर, आगाशिवनगर ही वर्दळीचे ठिकाणेही पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. तसेच आशियाई महामार्गासह शहरातून जाणाऱ्या कराड-चिपळूण, कराड-रत्नागिरी, कराड-सोलापूर, कराड-तासगाव रस्तेही पूर्णतः ओस पडल्याचे दिसून आले. एकंदरीत शहर व परिसरातील लोक कोरोना व्हायरसबाबत कमालीचे सतर्क असल्याचे दिसून आले. 
          सरकारने जाहीर केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला शहरी भागात अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची आशा होती. मात्र, त्यामानाने ग्रामीण भागात याबाबत लोकांमध्ये कमी जनजागृती असल्याने येथे कर्फ्यूला थंडा प्रतिसाद मिळण्याची चर्चा होती. परंतु, शहरासह ग्रामीण भागातही लोकांनी कोरोनाच्या संसर्गाची भयानकता लक्षात घेऊन जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही रस्ते, बाजारपेठा ओस पडल्याचे अभूतपूर्व चित्र दिसून आले. 
            चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा प्रसार झाला असून त्यानंतर आता हळूहळू जगभरात याचा झपाट्याने संसर्ग झाला आहे. चीन सरकारने अथक परिश्रमाने तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी इटली, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे या देशांमध्ये आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना याचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्राथमिक स्तरावर संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू केला. या कर्फ्यूला देशवासीयांनी कमालीचा प्रतिसाद दिल्याने रविवारी संपूर्ण देश ठप्प झाल्याचे अभूतपूर्व चित्र दिसून आले. 
           तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी व दक्षता बाळगण्यासाठी 31 तारखेपर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. तसेच या काळात लोकांनी सार्वजनिक ठिकाणी न जाता सरकारी आदेशाचे पालन करावे तसेच रोखण्यासाठी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. परंतु या निर्णयाबाबत लोकांमध्ये अद्यापही संभ्रमाची अवस्था असून अत्यावश्यक सेवेसह दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करण्यासाठी लोकांची धडपड सुरू असल्याचेही चित्र निदर्शनास आले. 

 

कडेकोट पोलीस बंदोबस्त : - 

केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यु लागू केला. तसेच जिल्हा प्रशासनानेही लॉक डाऊन जाहीर केल्याने पोलिस प्रशासनावर मोठी ताण पडला. मात्र, सातारा जिल्ह्यासह कराड व तालुक्यातील भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. ग्रामीण भागातील बऱ्याच गावातही हीच परिस्थिती होती. तसेच शहरातील चौकासह व ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता जनता कर्फ्यु शांततेत पार पडला. 

 

पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास : - 

कोणताही सण, उत्सव, समारंभ, पूर, भूकंप वा कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती आदी. संकटकाळात पोलीस ऑन ड्युटी राहून आपली सेवा इमाने-इतबारे बजावताना दिसून येतात. सध्या जगभरावर कोरोनासारखे एवढे भयावह संकट ओढवल्याने सरकारने लोकांना रस्त्यांवर, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदी केली होती. त्याचबरोबर लोकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. मात्र, या काळातही पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे ठाकले. त्यामुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या या सतर्कतेचे, देशसेवेचे, लोकसेवेचे कौतुक करण्यात आले. 

 

सायंकाळी 5 नंतर नागरिकांचा थाळीनाद : - 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य व पोलिस प्रशासनासह दैनंदिन गरजा पूर्ण करणारे सर्वजण 24 तास कार्यरत होते. या त्यांच्या देशसेवेसाठी तसेच लोकसेवेसाठी आभार व आदरभाव व्यक्त करण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना टाळ्या वाजवण्याचे तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील घरोघरी तसेच ग्रामीण भागातही लोकांनी घराच्या गॅलरीतून खिडकीतून तसेच दरवाज्यातून टाळ्या वाजवून व थाळीनाद करून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

 

नियम मोडणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद : - 

सरकारने रविवारी जाहीर केलेल्या जनता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 
मात्र, काही हौशे-गौशे नागरिकांनी तसेच युवकांनी सरकारी आदेश डावलून या-ना-त्या कारणाने रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला व नियम पाळण्याबाबत बजावले. त्यातही काहीजणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने निदर्शनास आल्यावर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत चांगलाच प्रसाद दिला.           

 

वैद्यकीय विभागाचे ही तत्परता : - 

जनता कर्फ्युमधून वैद्यकीय सेवा, पोलीस प्रशासन तसेच दैनंदिन गरजेच्या सेवांना वगळण्यात आले होते. त्यानुसार शासकीय आदेशानुसार शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह बहुतांशी खाजगी रूग्णालयातील सेवाही सुरू ठेवण्यात आली होती. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करून येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी कमालीची तात्पुरता दर्शवली. त्यामुळे त्यांचेही आभार मानण्यात आले. 

 

संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज : - 

देशभरात तरुणाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार राज्य सरकारने आरोग्य विभागाला दक्षतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय विभाग चोवीस तास कार्यरत असून तेथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच नगरपालिका प्रशासनाने शहरात विविध माध्यमातून जनजागृती सुरू ठेवली असून शहरातील मुख्य रस्त्यांवर कीटकनाशक व औषध फवारणी करण्यात येत आहे.