जाणता राजा आणि कावळ्यांची डोकेदुखी 

जाणता राजा आणि कावळ्यांची डोकेदुखी 


राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला हल्ली वाईट दिवस आले आहेत हे खरे आहे. कधी कधी करायला जातो एक आणि घडतं भलतंच, असा अनुभव राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाला येत आहे. २०१४ पासून आघाडीच्या या पक्षांना राजकीय खग्रास की खंडग्रास ग्रहण लागले आहे म्हणे ! राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या कावळ्यांची चिंता नको, आता राहिलेल्या मावळ्यांची चिंता करू या, असे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आणि जुने जाणते नेणते नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. घरट्यातून कावळे भुर्र उडून का जात आहेत, याचे चिंतन स्वयंघोषित जाणता राजाला करावेसे वाटत नाही. घरट्यात खायला काही उरले नाही, बसायला जागा नाही मग कावळ्यांनी का थांबायचे अशी ओरड सुरु आहे. अर्थात सत्ता नाही तर तिथे राहण्यात मतलब नाही, हे चाणाक्ष कावळ्यांना समजणे यात विशेष काहीच नाही. कावळेच ते, जिकडे मिळेल तिकडे जायचे आणि पोट भरायचे ! असो.                                                              अनेक पक्षांनी विविध पक्षी बाळगले आहेत. कुणाकडे बगळे आहेत तर कुणाकडे कावळे. एका राष्ट्रीय पक्षांत तर आपण बगळ्यासारखे कसे दिसू ही स्पर्धा गेल्या सत्तर वर्षांपासून सुरु आहे. अगदी बगळा हा राष्ट्रीय पक्षी घोषित करावा की काय असा विचार अनेकांच्या मनात सुरु असावा. काही जण राजहंसासारखे दुधातून दुध व पाणी कसे वेगळे करता येईल आणि मलई कशी खाता येईल यातच मग्न झाले होते. बगळ्यांनी तर बकध्यान करत तलावातील माश्यांचा फडशा पाडला. बगळा जरी पांढरा शुभ्र दिसत असला तरी त्याचे ध्यान मात्र मासे कसे मटकवायचे याकडेच असते ! त्याला हे बगळे तरी कसे अपवाद ठरतील ? असो. कावळ्यांची गोष्ट सुरु असताना बकपुराण सुरु झाले ! तोबा, तोबा. श्रावण महिना सुरु आहे ना ! २०१४ मध्ये कावळे आणि बगळ्यांचे सुखाचे दिवस संपले आणि त्यांच्या मागे साडेसाती सुरु झाली. ती शनीची होती की राहू- केतूची हे वाचकांनी स्वत:च्या तर्कशक्तीला आवाहन करून ठरवावे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रांचे राज्य आले. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी देवेन्द्रांना बिनशर्त पाठिंबा देत सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले होते. कावळ्यांचा हा चोंबडेपणा त्यांना महागात पडला. जाणता राजांनी त्यावेळी कावळ्यांना घेऊन जे राजकारण केले, त्याचेच परिणाम कावळे आणि राजा भोगत आहे, असा आरोप वाघाने केला आहे. जो करेल तो भरेल असे जरी असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आपली धडगत नाही, अशी खात्री पटल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जाणता राजाने अशा लोकांना कावळ्याची उपमा दिली आहे. मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जे कावळे राष्ट्रवादीतून उडाले त्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते ? असा विचार केला तर ज्यांना कावळ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बिनशर्त आवाजी पाठिंबा दिला होता, तेच होते ना ! राष्ट्रवादीच्या धरणाला लागलेली गळती हे त्यांच्या आजवरच्या खेकडी धोरणाचे परिणाम आहेत. मराठी माणूस आपल्याच माणसांचे पाय ओढतो, असा शोध पूर्वीच लागला आहे. एकूणच या प्रकाराला खेकडी धोरण म्हणत असावेत. खेकडे जसे एकमेकांचे पाय ओढतात आणि त्यामुळे एकही खेकडा कोळ्याच्या पाटीबाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे सर्व खेकड्यांचे अस्तित्व संपते. तसा जाहीसा प्रकार २०१४ साली पाहायला मिळाला, त्याचा आनंद खेकडे, कावळ्यांनी घेतला आणि आज तेच चिंतेत आहेत. आपण केले काय आणि झाले काय ! केला तुका आणि झाला माका, अशी अवस्था जाणता राजाची झाली. त्यातून ते सावरू पहात आहेत, परंतु कमळ सरोवराकडे कावळ्यांची झुंड जाताना दिसत आहेत. बोटाने हातावर मोजण्याएवढे आता घरट्यात उरलेले आहेत. घड्याळाचे काटेही आता गायब होऊ लागले आहेत, हातही कुठे दिसत नाही. घड्याळ आणि हाताचा मेळ लागत नाही.                                              २०१४ साली स्वतंत्र लढलेल्या शिवसेना, भाजपमध्ये राज्याच्या सत्तेसाठी मोठी स्पर्धा होती. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेसारख्या समविचारी पक्षाची गरज होती, शिवसेनेच्या मदतीशिवाय त्यांना सत्तेवर येणे अशक्य होते. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने भाजपला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची गोची करण्याची संधी कावळ्यांची जरी साधली तरी कावळ्यांच्या फालतू कावकावला घाबरेल तो  वाघ कसला ! वाघाने यातून मध्यम राजकीय मार्ग निवडला आणि विरोधकांवर मात केली. कावळ्यांनी लुडबुड करून तेव्हा फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. राजकारणात कधी कधी मागे पाऊल घ्यायचे ते,  मोठी झेप घेण्यासाठी हे वाघालाच माहित असते. तिथे कावळे, बगळ्यांचा काय पाड ! मग कावळे काय, राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात युतीला जिथे गरज आहे, तिथे मावळ्यांचे स्वागत होणारच आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादीत गळती सुरु असताना भाजप व शिवसेनेकडे नेत्यांचा महापूर चालला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेतृत्वाचे नेमके काय चुकते आहे, याचे उत्तर बड्या नेत्यांनाही सापडत नाही. पवार ज्यांना कावळे म्हणून हिणवत आहेत त्यांची डोकेदुखी विरोधी पक्षांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत वाढणार आहे.                                                                                              जाणता राजा शरद पवार यांनी दोन वर्षांपुर्वी काँग्रेसच्या महाआघाडीबाबत म्हटले होते की, महाआघाडी यशस्वी होण्याची शक्यता दिसत नाही. पवार जर महाआघाडीबाबत काही आक्षेपार्ह विधाने करत असतील तर विरोधकांनी त्यांच्यापासून सावध राहायला हवे, असा इशारा शिवसेनेने कॉंग्रेसला व विरोधी पक्षांना गत लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. आता त्याच शरद पवार यांच्या पक्षात दुही माजावी, हा काळाचा महीमा आहे. बंडखोरांना आवरायचे की आगामी विधानसभेची निवडणुकीची लढाई लढायची असा पेच आघाडीच्या पक्षांसमोर उभा राहिला आहे.

-    अशोक सुतार 
     ८६००३१६७९८