जिल्ह्यात कराड उत्तरसह चार ठिकाणी शिवसेना लढणार

जिल्ह्यात कराड उत्तरसह चार ठिकाणी शिवसेना लढणार

बंडखोरी टाळण्यासाठी भाजप सेनेकडून खबरदारी 

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी सध्या उमेदवारांची रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजप-शिवसेना युतीमुळे जिल्ह्यात नितीन बानूगडे-पाटील किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र दिसत असून ऐन वेळी कराड उत्तरला नवीन उमेदवाराचे नाव समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
                        राज्यात शिवसेना 126 भाजप 144 जागांसह अनेक तडजोडीवर युतीची गट्टी अखेर जमली आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप-शिवसेना व घटक पक्षांच्या महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला 4, भाजपला 4 तर 1 जागा सहयोगी पक्षाला देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
                       सातारा जिल्ह्यातील पाटण हा सेनेचा बालेकिल्ला असून या मतदारसंघासह वाई, कराड उत्तर व कोरेगाव या तीन जागांवर शिवसेनेने आपला दावा सांगितला आहे. त्या जागा त्यांना सोडण्यात आल्या आहेत. तर भाजपने सातारा-जावली, कराड दक्षिण आणि माण या तीन जागांवर आपला दावा सांगितला असून त्यांना या जागा सोडण्यात आलेल्या आहेत.
                       महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयने फलटणच्या आरक्षीत जागेवर आपला दावा सांगितल्याने त्यांना ती जागा देण्यात आलेल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभेच्या जागांवर महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी आपली दावेदारी सांगितली असली तरी याठिकाणी कोणाचे भाग्य उजळणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र, सातारा-जावलीतून शिवेंद्रराजेसिंहराजे भोसले (भाजप), वाई मधून पुरुषोत्तम जाधव (शिवसेना), माण जयकुमार गोरे (भाजप), कराड दक्षिण ना. अतुल भोसले (भाजप) यांची नावे फिक्स झाली आहेत. तर इतर जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू आहे.