जुन्या पिढीला जपने हे नव्या पिढीचे आद्य कर्तव्य - इंद्रजित देशमुख

सर्वांच्याच जीवनात जेष्ठ, वडीलधारी मंडळींचे योगदान महत्वाचे असते. ते आपल्याला नेहमी आदरणीय, गुरुस्थानी व देवस्वरूप असतात. त्यामुळे आधुनिकतेची कास धरताना जुन्या पिढीला जपने हे नवीन पिढीचे आद्य कर्तव्य आहे.

जुन्या पिढीला जपने हे नव्या पिढीचे आद्य कर्तव्य - इंद्रजित देशमुख
वहागाव : विलासराव पाटील यांना ‘वहागाव भूषण’ पुरस्कार प्रदान करताना श्री. इंद्रजित देशमुख साहेब. सोबत, प्रणव ताटे, सरपंच संग्राम पवार व मान्यवर.

जुन्या पिढीला जपने हे नव्या पिढीचे आद्य कर्तव्य - इंद्रजित देशमुख

वहागाव ग्रामपंचायतीचा ७१ वा वर्धापन दिन संपन्न : विलासराव पाटील यांना ‘वहागाव भूषण’ पुरस्कार प्रदान 

कराड/प्रतिनिधी :

      सर्वांच्याच जीवनात जेष्ठ, वडीलधारी मंडळींचे योगदान महत्वाचे असते. त्यामुळे ते आपल्याला नेहमी आदरणीय, गुरुस्थानी व देवस्वरूप असतात. त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि त्यांच्या आयुष्यातील कटू-गोड अनुभवांची शिदोरीच बऱ्याचदा आपल्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणास्त्रोत ठरते. त्यामुळे आधुनिकतेची कास धरताना जुन्या पिढीला जपने हे नवीन पिढीचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, तथा शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. इंद्रजित देशमुख यांनी केले. 

     शनिवारी १५ रोजी वहागाव ग्रामपंचायतीचा ७१ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने श्री. इंद्रजित देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा, तसेच विशेष पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

     यावेळी कराड तालुका पंचायत समितीचे सभापती श्री. प्रणव ताटे, वहागावचे सरपंच श्री. संग्राम पवार, उपसरपंच सौ. आनंदी पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. रंजना पवार, सौ. शीला पवार, सौ. सुजाता पुजारी, श्री. संतोष कोळी, श्री. धनंजय पवार, श्री. हणमंत शिंदे यांच्यासह जेष्ठ नागरिक, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

     सरपंच संग्राम पवार यांच्या संकल्पनेनूसार गावच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आदर्श माता पुरस्कार श्रीमती लिलादेवी पांडुरंग पवार, आदर्श शेतकरी पुरस्कार श्री. निवासराव महादेव पवार, आदर्श उद्योजक पुरस्कार श्री. मनोजराव पंढरीनाथ पवार व श्री. निवासराव ज्ञानू पावर यांना देण्यात आला. तसेच  वहागाव भूषण हा विशेष पुरस्कार श्री. विलासराव बापूसो पाटील व श्री. बापूराव विठोबा पवार यांना देण्यात आला.

     दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात मा. इंद्रजीत देशमुख, सरपंच संग्राम पवार, दिपक पवार, बाळासाहेब पवार, भीकु पवार, जनार्दन पवार (कॅप्टन) यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच संग्राम पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिकेत पवार यांनी केले. तर धनंजय पवार यांनी आभार मानले.