कै. शाहीर यादव प्रतिष्ठानच्यावतीने गोशाळेस चाऱ्याचा पुरवठा

कै. शाहीर यादव प्रतिष्ठानच्यावतीने गोशाळेस चाऱ्याचा पुरवठा
कै. शाहीर यादव प्रतिष्ठानच्यावतीने गोशाळेस चाऱ्याचा पुरवठा

 

कराड/प्रतिनिधी :

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब जनतेला अनेकांकडून जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर शहर व परिसरात मोठे  पशुधनही असून ते जगण्यासाठी संघर्ष करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कै. शाहीर  आत्माराम यादव प्रतिष्ठानच्यावतीने शहर व परिसरातील गोशाळेस ओल्या चाऱ्याचा पुरवठा केला. त्यांच्या या सजगतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांवर मोठे संकट ओढवल्याने गरजूंना सर्वच स्तरातून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्यामध्ये नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या असून त्यांनी अनेक दिवसांपासून गरजू, गोरगरीब लोकांना धान्य, भाजीपाला आदी. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु केला आहे. त्यानुसार गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत तब्बल 5000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप सुरु केले आहे.

    तसेच अनेक दिवसांपासून या महामारीमुळे शहरासह परिसरातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कै. शाहीर  आत्माराम यादव प्रतिष्ठानच्यावतीने पाहता हे पशुधन वाचवण्यासाठी शनिवारी मंडईमधील गोरक्षण ट्रस्ट, साई मंदिराची गोशाळा व कोरोना बाधीत जाधव कुटुंबियांच्या जाधव वस्तीवरील जनावरे अशा एकुण चव्वेचाळीस गाई व म्हशींना पुढील चार-पाच दिवस पुरेल इतक्या ताज्या चार्‍याचा पुरवठा करण्यात आला. तसेच 

गोशाळेच्या ठिकाणी जंतूनशकाची फवारणीही करण्यात आले. त्याचबरोबर  लॉकडाउन संपेपर्यत या जनावरांना नियमित चारा देण्याची जबाबदारीही कै. शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठानने घेतली आहे. त्यामुळे गटनेते यादव व प्रतिष्ठानने दाखवलेल्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

 
स्वतःची रुग्णवाहिका नगरपालिकेला सुपुर्द करण्याची तयारी :- 
 
शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, नुकतेच शहरातील एका कोरोना बाधित रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात चालत नेण्याचा अतिशय गंभीर प्रकार घडला. ही बाब शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेअत्यंत चिंताजनक आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कै. शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठानने स्वत:ची रुग्णवाहिका कोरोनाचा पूर्ण कालावधी संपेपर्यंत नगरपालिकेला सुपुर्द करण्याची तयारी गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दर्शवली आहे.