कळंबा कारागृहात खुनी हल्ला; सोलापूरच्या जखमी कैद्याचा मृत्यू

कळंबा कारागृहात खुनी हल्ला; सोलापूरच्या जखमी कैद्याचा मृत्यू

 


कोल्हापूर  / प्रतिनिधी -

       कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सोलापूरच्या कैद्याचा मृत्यू झाला. सुनील मारुती माने (वय-३४) असे मृत कैद्याचे नाव असून तो नातेपुते येथील रहिवासी होता. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार परमेश्वर उर्फ देवा नानासाहेब जाधव (वय-३५, रा. कोरेगाव, ता. सांगोला) याच्याविरुद्ध येथील राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.                                                                                                                गुरुवारी (दि.२७ जून) दुपारी संशयित परमेश्वर याने माने यांच्यावर दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाला होता. माने याला शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना माने यांचा मृत्यू झाला. दोन वर्षापूर्वी युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सुनील मानेला अटक झाली होती. तर संशयित परमेश्वर व त्याच्या साथीदारांना खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. दोन्ही गुन्हेगारांची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृह झाली होती.                                                 परमेश्वर उर्फ देवा याने सुपारी घेऊन आपल्या भावावर हल्ला केला असल्याचा आरोप माने याचा भाऊ आणि लष्करातील जवान अनिल मारुती माने याने पत्रकारांशी बोलताना केला. सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वॉरंट आदेशाने परमेश्वर जाधवला ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात येत असल्याचे राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले