काले येथील जवान दैवत साळुंखे यांचे अपघाती निधन

काले येथील जवान दैवत साळुंखे यांचे अपघाती निधन

 

कराड/प्रतिनिधी :

             काले ता. कराड येथील जवान दैवत दत्तात्रय साळुंखे (वय 36) यांचे सोमवारी दुपारी अपघाती  निधन झाले. सध्या ते औरंगाबाद येथील 41 असलरी डिव्हिजन येथे हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर हजर झाले. मात्र, दुपारी औरंगाबाद येथे त्यांचे अपघाती निधन झाले. जवान दैवत साळुंके यांच्या निधनाने कालेसह परिसरावर शोककळा पसरली आहे. काले येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

            जवान दैवत साळुंके हे सन 2000 साली सैन्य दलात भरती झाले होते.  त्यांनी नाशिक, आसाम, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड यासह इतर राज्यात आपले कर्तव्य बजावले होते. सध्या ते औरंगाबाद येथील 41 असलरी डिव्हिजन येथे हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर हजर झाले. मात्र, दुपारी औरंगाबाद येथे त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काले परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने लोकांमधून हळहळ व्यक्त होत होती.

          दरम्यान, जवान दैवत साळुंखे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  त्यांच्या काले या गावी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आले होते. पार्थिव घरासमोर आल्यानंतर साळुंखे यांच्या आई-वडिलांनी या घटनेचा मोठा धक्का बसला. तसेच  त्यांच्या पत्नी स्नेहल यांच्यासह मुलांनी आक्रोश केला. तर बहिणी रूपाली व दिपाली यांनीही भावाच्या विरहाने हंबरडा फोडला. संपूर्ण साळुंखे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली होती.                

            यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नायब तहसीलदार राजेंद्र तांबे, मंडलाधिकारी रमेश ढाणे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून साळुंखे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या निधनाने काले ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता. दैवत साळुंके अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत शाश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. गावातील मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.