नवसाला पावणारा नंदी

 

नवसाला पावणारा नंदी

काले ता.कराड येथे नंदी यात्रा ही एक ऐतिहासिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा नंदी अशी ख्याती आहे. या यात्रेसाठी भाविक घरटी पाच नारळाचे तोरण बांधून मनोभावे पुजा करतात. तर पंचक्रोशीतील नागरिकही यामध्ये सहभागी असतात. कुंभार समाजाला या यात्रेचा मान असतो. आणि इतर 12 बलोतेदार ही या यात्रेत सहभागी असतात. सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारी ही अगळी-वेगळी यात्रा आज पार पडत आहे. बेंदराला या नंदीची स्थापना केली जाते. आणि त्याचे विसर्जन पाचव्या दिवशी होते. त्यानिमित्ताने थोडक्यात घेतलेला आढावा...

 

 कराड दक्षिण विभातील एक ऐतिहासिक वारसा असणारे दक्षिण मांड नदीच्या तीरावरील तसेच उत्तरेकडील भव्य आगाशिव डोंगराच्या  कुशीत ,आणि पुर्व दिशेला उत्तर दक्षिण वाहणारी महाराष्ट्राची जलवाहीनी कृष्णा नदी, तसेच राष्ट्रीय महामार्ग पुणे ते बंगलोर गावाच्या शिवेवरून एक मोठी  दळणवळण मार्गालगत, तसेच पुणे ते  रत्नागीरी असा सर्वात जवळ अंतर असणारा राज्यमार्ग याच गावालगत असणारे काले गाव, इथल्या मातीच्या  पावन स्पर्शाने पुलकीत झालेले कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेची मुहूर्त मेढ याच भूमीत रोवली. अनेक कुस्तीगीर, नामांकित पैलवान, चळवळीतील गाव, दक्षिण मधील मोठे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, या गावच्या  शिवेवर लगतच असणारे नांदलापूर, मलकापूर, जखीणवाडी,कृष्णा हॉस्पिटल परीसर,आटके, वाठार, रेठरे, कालवडे, मालखेड, नांदगाव, ओंड उंडाळे अशी राजकीय दृष्ट्या छाप पाडणारी गावे येतात. एकंदरीत अशीपार्श्वभूमी असणारे गाव,  याच गावात गावचे ग्रामदैवत असणारे श्री व्यंकनाथ (वाकोबा) नावाने परिचित असणारे अतिशय उत्कृष्ट असणारे हेमापंथीय दगडी बांधकामावर नक्षीचे खांब असणारे भव्य मंदिर आहे, घोड्यावर विराजमान झालेली श्री व्यंकनाथाची आकर्षक मुर्ती डोळ्याचे पारणे फेडल्या शिवाय रहात नाही. याच मंदीराच्या भव्य सभामंडपात भगवान श्रीशंकराचे वाहन, शिवगणातील आवडता महादेवाचा नंदी ची यात्रा या मंदिरात साधारपणे दोनशे वर्षापासून आषाढ महीन्यात मोठ्या उत्साहात, हर्षउल्होषात भरत असते, पंढरपूर च्या श्रीविठ्ठलाची आषाढी एकादशीला यात्रा भरते, नेमकी याच दिवसी काले येथील कुंभार समाजातील बांधवांकडून तीन ते पाच फूटाच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली जाते, यासाठी वारूळाच्या विशिष्ट मातीतून अतिशय देखणी मुर्ती तयार केली जाते. महाराष्ट्रातील बळीराजा याचा जवळचा सहकारी बैल याची वर्षभर केलेल्या कार्याचे कुठेतरी कोडकौतुक व्हावे म्हणून आषाढ शु 13/14 रोजी महाराष्ट्र बेंदूर संपूर्ण राज्यात साजरा केला जातो, या बैलांना, न्हावू घालून, शिंगे रंगवून,आंगावर झुल घालून, गळ्यात घुंगराची माळ घालून चांगली बॅड, ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते हे आपल्या सर्वांना माहित आहेच. परंतु काले गावची पाच दिवस भरणारी यात्रा  परीसरात प्रसिद्ध आहे. या पाच दिवसात मिठाई ची, नारळ अगरबत्ती, गुलालाची, लहान मुलांची खेळण्याची दुकाने, पाळणे लक्ष वेधून घेतात. अनेक माहेरवाशीण, आप्तस्वकीय, नातेवाईक प्रत्येकाच्या घरी आनंदाने सहभागी होतात. या महानंदीची दररोज सायकाळी आरती होत असते.

नवसाला पावणारा नंदी असल्यामुळेच गावातील व पंचक्रोशीतील नागरीक बैलांची मिरवणूक काढत, सर्व जण मानाचे पाच नारळाचे तोरण नंदीला अर्पण करत असतात, गुलालाने माखलेले नंदीचे मस्तक, पाणीदार डोळे, आणि वरती विराजमान झालेली व्यंकनाथाची मुर्ती डोळेभरून पाहून नतमस्तक होतात. मनातल्या मनात नंदीजवळ आपली मनोकामना बोलून दाखवतात. आणि नंदी त्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करतो, यातून उतराई होण्यासाठीच भावीक तोरण प्रदान करत असतात. पुर्वी  यात्रा काळात अनेक मनोरंजन कार्यक्रम, भजन, कीर्तन, बेदीक, भारूड, तमाशा, चित्रपट भरवले जायचे, माझे वडील कै बाबुराव कृष्णाजी कुंभार आप्पा यांनी अनेक वर्ष नेतृत्व करत होते, भारतीय लोककला, शेतातील कामे झाल्यामुळे,आणि पावसाची रिमझिम सुखावलेला बळीराजा आनंदात सहभागी होत असतो. पाचव्या दिवशी विसर्जनाचा कार्यक्रम घरातील लहान थोर सहभागी होतात, वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात येत असते. बाजारपेठेत शिवकालीन हत्यारे दांडपट्टा फिरवण्याचे हलगीच्या तालावर खेळले जातात, आयुष्यात एकदा तरी हा सोहळा डोळेभरून पहायला पाहीजे. दक्षिण मांड नदीत पाण्यात विसर्जन सायंकाळी पाच वाजता केले जाते, नंदी यात्रे दरम्यान हमखास पाऊस असतोच, नदीला पाणी असतेच, काही दुष्काळात नेमके याच दिवसी नदीला पाणी आल्याच्या घटना घडल्या आहेत. नंदी आणि व्यंकनाथ गावचे, परीवाराचे रक्षण करत असल्यामुळेच लोक मनोभावे पुजन करत असतात. सध्या पाऊसकाळ चांगला झाला आहे, नुकतीच श्रीविठ्ठलाची आषाढी वारी दिमाखात पार पडली आहे, गेले दोन वर्ष कोरोना चे जागतिक संकट दुर झालेले आहे.तरीपण तुरळक केसेस आढळून येत आहेत. स्वतः काळजी घेत, कोव्हीड प्रोटोकॉल पाळत आपण जरूर सहभागी व्हा. कोरोना चे संकट नाहीसे होऊ दे, बळीराजाला चांगले सुखाचे दिवस येऊ दे, एवढे मागणे श्रीनंदीचरणी अर्पण करून परमेश्वराला साकडे करू या. नंदीच्या नावाने चांगभल, वाकोबाच्या नावाने चांगभल.!!