कराड-कोल्हापूर वाहतूक बंद। रुग्णवाहिका चालकांची कसरत

कराड-कोल्हापूर वाहतूक पुन्हा बंद 

रुग्णांचे प्राण वाचावण्यासाठी रुग्णवाहिका चालकांची पाण्यातून कसरत 

कराड/प्रतिनिधी : 
                        पुणे-बेंगलोर महामार्गावर वाठार ता. कराड येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या महामार्गावर सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत 5 फूट पाणी साचले असून बुधवारी रात्री8 वाजण्याच्या सुमारास या महामार्गाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या पाण्यातूनही रुग्णांचे प्राण वाचावण्यासाठी रुग्णवाहिका चालक आपले प्राण धोक्यात घालून रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी पाण्यातून मार्ग काढत आहेत. 
                   मंगळवारी दिनांक 6 रोजी नदीच्या पुराचे पाणी पुणे-बेंगलोर महामार्गावर याच ठिकाणी आल्याने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारी सकाळी पुराचे पाणी काहीसे ओसरल्याने कोल्हापूरवरुन कराडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. 
                       परंतु, बुधवारी दिनांक 7 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर पुन्हा पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, या पाण्यातूनही काही वाहनचालक आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून वाहनधारकांना जीव धोक्यात न घालता उद्या सकाळी महामार्ग सुरळीत झाल्यावर मार्गस्थ होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.