कराडमध्ये कृष्णा कोयनेच्या पुराचा हाहाकार

कराडमध्ये कृष्णा कोयनेच्या पुराचा हाहाकार
कराडमध्ये कृष्णा कोयनेच्या पुराचा हाहाकार
कराडमध्ये कृष्णा कोयनेच्या पुराचा हाहाकार

 

कराड/प्रतिनिधी : 
                        गेल्या आठ-दहा दिवसापासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार चालू आहे. तसेच कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा कराड शहराला वेढा पडला असून शहरात पुर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे.  
                     कराड शहराला पुराचा वेढा पडला असून दत्त चौक, शाहू चौकसह नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील कुटुंबाचे नगरपालिका शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. कराडची पूरस्थिती गंभीर होत असून महसूलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी भेट देऊन पुर परिस्थितीची पाहणी केली. 
                     कोयना नदीच्या वाढत्या पातळीमुळे तालुका कराड गावाला पाण्याने पासून भेटले आहेत तसेच येरवळे, किरपे, आणे, कैसे या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
                   त्याचबरोबर कृष्णा नदीच्या पुरामुळे ही कराड तालुक्यातील नदीकाठच्या बहुतेक गावांना पाण्याने वेढले असून येथील लोकांनाही प्रशासनाने सुरक्षित सकाळी ठिकाणी हलवण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील कराड, कोडोली, वडगाव, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द मालखेड, गोंदी या गावांनाही पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे तेथील लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 
                     या सततच्या संततधार पावसामुळे व धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा
विसर्ग करण्यात येत असलेल्या तालुक्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कराड येथील जुना कृष्णा पुल काल सोमवारी पाण्याखाली गेला होता. मात्र, मंगळवारी पाण्याची पातळी वाढली असून बाजूला असलेला नवीन कृष्णा पुलालाही पाणी लागले आहे. त्यामुळे कराड-विटा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
                      तसेच कराड-पलूस मार्गावरील कार्वे गावानजीक असलेला कृष्णा पूलही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कराड-पलूस-तासगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा पुलावरूनही पाणी गेल्याने काल रात्रीपासून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

                            

कराड येथील दत्त चौकात पहिल्यांदाच पाणी 

2005-2006 साली मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या वर्षी दहा-पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पहिल्यांदाच कराड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यालाही कृष्णा-कोयनेच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

                           
पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनाची सतर्कता

कराड शहरात पूरपरिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. या पूरस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने सलग दोन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुराचे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाले असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी कराड नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्कतेने काम करत आहे.
 

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अहोरात्र बचावकार्य

कराड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पूरपरिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना, इतर नागरिकांना नगरपालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पुर परिस्थिती निर्माण झाली असून त्याठिकाणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत अहोरात्र मदतकार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांकडून नगरपालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 
 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी 

येथील शाहू चौक, दत्त चौक, पाटण कॉलनी, शुक्रवार पेठेतील बहुतांशी भाग, सोमवार पेठ परिसर या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी येथे वाढत्या पाणीपातळीची पाहणी करून नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे. त्याचबरोबर वाढत पावसामुळे व कोयना धरणातून संभाव्य 
पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.