कराडकर भगिनींचे एनडीआरएफच्या जवानांसोबत रक्षाबंधन

कराडकर भगिनींचे एनडीआरएफच्या जवानांसोबत रक्षाबंधन

राखी बांधून व्यक्त केले आभार, युवकांकडून वंदे मातरम्’चा जयघोष

कराड/प्रतिनिधी :

             सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एनडीआरएफच्या  जवानांना पाचारण केले होते. सतत चार-पाच दिवस या जिगरबाज जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांना अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. मात्र, सांगलीहून एनडीआरएफ जवानांची टीम परतत असताना येथील कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा नाका याठिकाणी कराडकर भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी वातावरण खूपच भावूक झाले होते.                                                                                                                                                          अतिवृष्टी व अलमट्टीच्या फुगवट्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पुरातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून देशातील एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. या जवानांनी सतत चार-पाच दिवस आपल्या जीवाची बाजी लावून सांगली, कोल्हापूरमधील हजारो नागरिकांना महापुराच्या मगरमिठीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. अशा संकटसमयी आपले प्राण वाचवण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या जवानांमध्ये लोकांना अगदी देवदूत दिसला. त्यामुळे आपली कामगिरी बजावून हे जवान परताना त्यांना निरोप देतेवेळी अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. सांगलीहून एनडीआरएफच्या जवानांची एक टीम पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास करणार असल्याची माहिती कराड शहरातील नागरिक, बंधू-भगिनींना मिळाली. त्यानुसार मंगळवारी 13 रोजी सकाळी 6 वाजता येथील महामार्गावर कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा नाका याठिकाणी कराडकर भगिनींनी त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी जवानांना राखी बांधून फुलांच्या वर्षाव करत त्यांचे औक्षण केले.                                                                                                यावेळी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर आदींसह नगरसेवक, नगरसेविका आणि कराडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिला, युवतींनी जवानांच्या स्वागतासाठी रस्त्याकडेला आकर्षक रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले. नागरिक, युवकांनीही यावेळी जवानांच्या या कामगिरीबद्धल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच उपस्थित युवकांनी जवानांना खांद्यावर उचलून घेत भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष केला.   दरम्यान, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, महापूरासारख्या भीषण संकटसमयी आपल्या जीवाची पर्वा न करता भारत सरकारच्या एनडीआरएफ टीमच्या जवानांनी सांगली, कोल्हापूरमधील हजारो लोकांना बाहेर काढून त्यांनी खरोखरच मोलाची कामगिरी केली आहे. त्या जवानांना आम्ही आज राखी बांधून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या