कराड आगाराचे आजअखेर १ कोटी ८४ लाखांचे नुकसान

कराड बस स्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचा महामंडळाचे शासनात विलीनीकरण होण्यासाठी बेमुदत संप सुरू आहे. या संपाचा आज मंगळवारी ३० रोजी २३ वा दिवस असून बससेवा पूर्णपणे बंद आहे. यामुळे कराड आगाराचे संपकाळात आजअखेर सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कराड आगाराचे आजअखेर १ कोटी ८४ लाखांचे नुकसान
कराड : एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने कराड आगारातील बस गाड्या 23 दिवसांपासून जाग्यावरच उभ्या आहेत.

कराड आगाराचे आजअखेर १ कोटी ८४ लाखांचे नुकसान

संपाचा २३ वा दिवस : ४४ कर्मचारी निलंबित, तर 4 जणांची सेवासमाप्ती, विलगीकरणाचा लढा सुरूच

कराड / राजेंद्र मोहिते :

       एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. कराड बस स्थानकाबाहेरही एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे कराड आगाराचे संपकाळात आजअखेर १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली. 

       राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने महामंडळासह राज्य सरकारलाही कोट्यावधी रुपयांचा तोटा झाला आहे. तसेच नुकतीच शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, प्रवास्यांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी गृहीत धरून त्यांना पगारवाढ दिली आहे. परंतु, तरीही कर्मचारी विलगीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अखेर राज्यभरातील शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबणासह सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. त्यानुसार कराड आगारातही आजअखेर ४४ जणांचे निलंबन केले असून ४ जणांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

         कराड आगारात एकूण ४६५ कर्मचारी आहेत. त्यामध्ये चालक आणि वाहक यांची संख्या ३३९, तर प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी ९७ इतके आहेत. त्यातील सर्वच्या सर्व प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी कामावर रुजू असून उर्वरित चालक व वाहक संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगारातील सर्वच्या सर्व एसटी गाड्या जागेवरच उभ्या असल्याने बससेवा पूर्णपणे ठप्प आहे. आज मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा २३ वा दिवस आहे. यामुळे एका दिवसाला सुमारे 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या कराड आगाराला संपकाळात आजअखेर एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

      दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊनही, तसेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारूनही आंदोलक एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या आपल्या मुख्य मागणीवर अजूनही ठामच आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला विलगीकरणाचा लढा सुरूच ठेवला असून मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धारच त्यांनी केला आहे.

 

आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांची अंगत-पंगत

कराड बस स्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज मंगळवारी २३ वा असून विलगीकरण झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी सुमारे पंधरा-वीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळीच चूल मांडली असून रस्त्यावरच त्यांनी अंगत-पंगतही मांडली आहे. हे चित्र लक्षवेधी ठरत आहे.

कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे

राज्यभरात एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने महामंडळाचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे. त्यामध्ये एकट्या कराड आगाराचे संपकाळात आजअखेर सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परिवहन मंत्र्यांनी सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. तरीही सेवेत रुजू न झालेल्यांवर निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई करण्यात येत आहे. परंतु, कर्मचाऱ्यांनी स्वतःसह महामंडळाचे नुकसान टाळण्यासाठी सेवेत रुजू व्हावे.

      - विजय मोरे (प्रभारी कराड आगार व्यवस्थापक)

कारवाईला घाबरत नाही

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, यासाठी बेमुदत संप पुकारल्याने महामंडळाकडून अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनासह सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये माझीही सेवासमाप्ती करण्यात आली आहे. परंतु, अशा कारवाईला कोणताही कर्मचारी घाबरत नसून विलगीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.

       - घनशाम नांदगावकर (आंदोलक एसटी कर्मचारी)