जिल्हा बँक निवडणूक मलकापूरात खलबते

प्रदेशाध्यक्षांची खासदार-आमदारांच्या उपस्थितीत गोपणीय बैठकःरणनीति निश्चित

जिल्हा बँक निवडणूक मलकापूरात खलबते

जिल्हा बँक निवडणूक मलकापूरात खलबते


प्रदेशाध्यक्षांची खासदार-आमदारांच्या उपस्थितीत गोपणीय बैठकःरणनीति निश्चित


कराड/प्रतिनिधीः


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीची तयारी जोमाने सुरू असून एकीकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही चाचपणी सुरू केली असून त्यांची रणनिती ठरविण्यात येत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक असो अथवा नगरपरिषदेच्या निवडणूका असो त्या भाजपा लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. याला दोन दिवस उलटतात तोच आज जिल्हा बँकेच्या निवडणूकीसंदर्भात मलकापूरात बैठक पार पडली असून जिल्हा बँकेच्या निवडणूकीचे केंद्र कराडकडे सरकल्याचे पहायला मिळत आहे. आजची बैठक ही गोपणीय पद्धतीने झाल्याचे समजते.


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सर्वाधिक काळ कराड दक्षिणचे नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे वर्चस्व राहिले होते. त्यानंतर या बँकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. बारामतीतून सर्व सुत्रे हलवत कुण्याच्याही ध्यानी मनी नसताना व तशी चर्चाही कधी झाली नसताना विलासकाकांचे जिल्हा बँकेतील सत्ताकेंद्र संपवून राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले. फलटणमधून बँकेची सुत्रे हलू लागली होती. रामराजे नाईक-निंबाळकर यांची या बँकेवर मजबूत पकड असून त्यांनी सलग 15 वर्षे आपली ताकद अबाधित ठेवली आहे. अशातच आता जिल्हा बँकेची निवडणूक होवू घातली असून या संधर्भात निवडणूकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय उलथापालथीही पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अगामी निवडणूकीला कसे सामोरे जायचे यासंदर्भात बैठका घेत आहेत.


राष्ट्रवादीचे बँकेवर वर्चस्व असतानाच गत पाच वर्षातील राज्य सरकार हे युतीचे होते यामध्ये अनेक घडामोडी झाल्या काहींनी निवडणूकीच्या तोंडावर पक्षांतर केले. भाजपमध्ये येणार्‍यांची राज्यभर मोठी संख्या होती. अशातच जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले रणजित नाईक-निंबाळकर तसेच आमदार जयकुमार गोरे यांनी पक्षाला निवडणूकीच्या तोंडावर सोडून देत भाजपात प्रवेश केला आणि विधानसभा-लोकसभेच्या निवडूका लढविल्या यामध्ये हे तिघेही निवडून आले. राष्ट्रवादी आणि काँगे्रसमधून यांनी बाजूला होत, जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढविली. त्यामुळेच होवू घातलेल्या जिल्हा बँक निवडणूक अथवा नगरपरिषदेच्या निवडणूका भाजप स्वतःच्या ताकदीवर लढणार असे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीची जी पकड होती ती सैल झाली आहे. याचा फायदा भाजपा उचलणार हे निश्चित.


काही दिवसांपूर्वी आम्ही दैनिक प्रीतिसंगममधून दादांनी ठरवले तर जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या सामना रंगणार अश्या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर भाजपाच्या हालचाली ही तशा दिसू लागल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील कराड येथे आले होते. त्यांची भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.अतुल भोसले यांच्या समवेत खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आ.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली मात्र या बैठकीला बँकेचे विद्यमान चेअरमन व भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित नव्हते. भाजपाने या निवडणूकीसंदर्भात रणनिती निश्चीत केली असून ही निवडणूक भाजपा लढविणार हे खात्रीशिर समजते. डॉ.अतुल भोसले यांनीही भाजपला विश्वासात घेतले नाही तर जिल्हा बँकेची निवडणूक होणार आणि त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी देईल तो आदेश आम्ही पाळू असे म्हटले होते. त्याचाच भाग म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणूकीची बैठक मलकापूर येथे पार पडली आहे. लवकरच भाजपाची रणनिती स्पष्ट होईल. यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी कराड येथीही काही ठिकाणी बैठका घेतल्याचे समजते.