चरेगावात इमारतींच्या नोंदीच नाहीत ; अनेकांनी लाखोंचा महसूल बुडवला

चरेगांव येथील प्रकार ; ग्रामसेवकाचे निलंबन करावे तर, सरपंच पद रद्द करण्याची मागणी

चरेगावात  इमारतींच्या नोंदीच नाहीत ;  अनेकांनी लाखोंचा महसूल बुडवला
चरेगावात  इमारतींच्या नोंदीच नाहीत ;  अनेकांनी लाखोंचा महसूल बुडवला

उंब्रज / प्रतिनिधी 

चरेगांव ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत २००७ पूर्वी बांधण्यात आलेल्या काही आरसीसी इमारतींची आजतागायत ग्रामपंचायतील नोंदी करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे नोंदीच नाहीत तर कर कुठला. या प्रकाराने ग्रामपंचायतीचे दरवर्षी लाखों रुपयांचे नुकसान होत असुन याचा परिणाम गावांतर्गत विकास कामांवर झाला आहे.  विशेष बाब म्हणजे गावातील काही प्रतिष्ठित व ग्रामपंचायतीत पदाधिकारी असलेल्या सफेदपोश लोकांनीही त्यांच्या इमारतीच्या नोंदी केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी होवून संबंधितांवर कारवाई व्हावी या स्वरुपाची मागणी चरेगाव येथील जवान सचिन सुर्यवंशी यांनी पत्रकाव्दारे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. 
      
चरेगाव ता.कराड येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधलेल्या सुमारे ३६ इमारतींच्या नोंदी झालेल्या नाहीत.  ग्रामसेवक व सरपंच यांनी जाणीवपूर्वक या नोंदी न करता शासनाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा हा  धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन ग्रामसेवकांचेे निलंबन करावे,तर विद्यमान सरपंच यांचे पद रद्द करण्याची मागणी सचिन सुर्यवंशी यांनी केली आहे.  
  
निवेदनात म्हटले आहे की, चरेगांव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विद्यमान सरपंच यांच्या मदतीने शासनाचा लाखो रूपयांचा कर  बुडवला आहे. ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या १२६ आरसीसी इमारती पैकी ३६ आरसीसी इमारतींच्या बांधकामांच्या नोंदी शासन दरबारी जाणीवपूर्वक न केल्याने जानेवारी २००७ ते डिसेंबर २०१८ अखेर सुमारे १० ते १२ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.सदर इमारती १२०० ते ३५०० चौरस फूट एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेल्या आहेत.
   
या नोंदी न करण्या पाठीमागे राजकीय हस्तींचा वरदहस्त असल्याचा आरोप सचिन सुर्यवंशी यांनी केला. तसेच यामुळे ग्रामपंचायतीचे लाखों रुपयांचे नुकसान होवून त्याचा परिणाम गावातंर्गत विकास कामे राबवण्यावर झाला आहे.  त्यामुळे ग्रामसेवक व विद्यमान सरपंच यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून ग्रामसेवकांचे निलंबन करून सरपंच पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.