कराडला बेड वाढवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

कराड हॉस्पिटलला कोवीड उपचारासाठी लागणार आठवडा

कराडला बेड वाढवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

कराड/प्रतिनिधीः-


सातारा जिल्ह्यात कराड तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज 150 च्या आसपास रूग्ण कोरोनाबाधित म्हणून समोर येत आहेत. त्यामुळे अनेकांना बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी बेडच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कराडमध्ये बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जर बेड वाढवले तर 1411 रूग्णांच्यांवर एकाचवेळी उपचार होऊ शकतात. दरम्यान, जिल्हाधिकर्‍यांनी कराड हॉस्पिटल कोवीड हॉस्पिटल बनवले असल्याचा आदेश दिला आहे. तर या रूग्णालयाचे डॉक्टर वैभव चव्हाण यांनी रात्री उशिरा सोशल मिडियावर हे रूग्णालय कोविड रूग्णालय होण्यासाठी आठ दिवस लागतील अशी पोस्ट फिरवली आहे. यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांचे आदेश पाळले जाणार की चालढकल केली जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे तालुक्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. त्याचबरोबर अ‍ॅॅण्टीजेन टेस्टही सुरू करण्यात आल्या असल्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत शहरातील रुग्णालयात बेडच उपलब्ध नाही. सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 400, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 75, एरम हॉस्पिटलमध्ये 61, श्री हॉस्पिटलमध्ये 40 बेडची उपलब्धता आहे. त्याचबरोबर पार्लेतील सेंटरमध्ये 200 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या हजारात आणि बेड तोकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णांना ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. रूग्णांचे नातेवाईक वारंवार रूग्णालयात हेलपाटे घालून आपल्या रूग्णाला बेड मिळतो का याची प्रतिक्षा करताना पहायला मिळत आहेत. परिणामी अनेकांना ऑक्सिजनचे बेड मिळाले नाहीत. त्यातील काही रुग्णांना जीवासही मुकावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बेड वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. आमदार चव्हाण यांनी बहुउद्देशीय हॉलमध्ये नवीन कोरोना सेंटर करण्याचेही सूचित केले होते. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी तेथे पाहणी केली असून याठिकाणी 50 बेडची उपलब्धता करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.


जिल्हाधिकारी सिंह यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 55 बेडची नवीन व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे तेथे 55 नवीन बेड उपलब्ध झाले आसून कराड हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने अधिगृहीत केले आहे. तेथे 60 नवीन बेडची व्यवस्था होणार आहे आणि कृष्णा हॉस्पिटल 200 बेड, सह्याद्री हॉस्पिट 75, श्री हॉस्पिटल 20 बेड, सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज 100, जैन समाजाच्या सेंटरमध्ये 25, वारणा हॉटेल 50, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50 अशा वाढीव बेडची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार हॉस्पिटलचे 986 आणि कोविड सेंटरचे 425 असे 1411 बेड उपलब्ध होणार आहेत.