काका-बाबा दिलजमाईने काँग्रेसला ‘अच्छे दिन’

उंडाळकरांचे जिल्हाभर नेटवर्क

काका-बाबा दिलजमाईने काँग्रेसला ‘अच्छे दिन’

काका-बाबा दिलजमाईने काँग्रेसला ‘अच्छे दिन’


कराड/प्रतिनिधीः-


माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि जेष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील (काका) यांची 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिलजमाई झाली आहे. या दोन गटाच्या मनोमिलनामुळे कराड तालुक्यासह जिल्ह्यातील काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकीय पटलावर उंडाळकर घराण्यातील युवा नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचाही उदय होणार आहे. निमित्त जरी त्यांच्या आगमनाचे असले तरी याचे दुरगामी परिणाम मात्र जिल्ह्यात दिसून येणार आहेत.


बाबा व काकांनी आपल्या उमेदीच्या काळात केंद्रात आणि राज्यात आपला अंमल दाखवून दिला होता दोघेही काँग्रेस विचाराचे खंदे समर्थक परंतु अंतर्गत कुरबुरीमुळे टोकाचे मतभेद निर्माण झाले होते.दोघांनाही एकमेकांची गरज होती व आहे पण तालुक्याच्या दुर्देवाने या दोघांमधील वादविवाद हे कायमच तेवत ठेवण्यात काहीजण यशस्वी झाले आणि यामुळे कराड तालुक्याचे कधीही न भरून येणारे मोठे नुकसान झाले.राज्यात काका आणि केंद्रात बाबा असे समीकरण काही काळ होते परंतु याचा म्हणावा तितका उपयोग जिल्ह्याला,तालुक्याला आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला झाला नाही.या दोघांच्या वादात तिसराच डोईजड झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.


जिल्हा बँक,खरेदी विक्री संघ तसेच पंचायत समिती,कोयना दूध संघ,तालुक्यासह जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी या संस्थावर काकांचे एकछत्री राज्य होते.तर केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर होता परंतु जिल्ह्यातील राजकारणात बाबा काका गटात दुही असल्याने काँग्रेसची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच जास्त प्रमाणात झाली पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हयात आपले हात पाय पसरून आपली राजकीय मोठ बांधली गेली.


बाबांचे वय सध्या सत्तरी पार करून पुढे गेले आहे तर काकांनी वयाची ऐंशी पार केले आहे यामुळे काँग्रेस विचार जिवंत ठेवण्यासाठी राजकीय वारसदाराची काकांपेशा जास्त गरज पृथ्वीराज चव्हाण यांना होती आजपर्यंत बाबांनी ज्यांना जवळ केले त्या सर्वांनी ऐनवेळी पक्षासह बाबांशी प्रतारणा करीत दुसर्‍या पक्षाची वळचन धरली यामुळे निष्ठावंत काँग्रेसजन अंतर्मनाने दुखावले गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा गड खिळखिळा झाला.आणि यांचा फायदा इतर पक्षांनी उचलत आपली खुंटी बळकट केली.


कराड दक्षिणेच्या राजकारणात कायमच उत्तरेचा वरचष्मा राहिला आहे.उसना पैरा फेडताना जर तर चे राजकारण कायमच होत असल्याने दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था झाली आहे.कृष्णा कारखाना,सह्याद्री कारखाना,कराड नगरपालिका, मलकापूर नगरपंचायत, बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद या ठिकाणच्या निवडणुका आजपर्यंत नेहमी काका,बाबा,आणि इतर गटात लढल्या गेल्या परंतु मतविभागणीचा तोटा हा कायमच काका बाबा गटाला भोगावा लागला व पर्यायाने सत्ताकेंद्र बदलत जाऊन इतर राजकीय पक्ष डोईजड झाले.ययामुळे काका बाबा गटाचे मनोमिलन जिल्ह्यासह तालुक्यावर दूरगामी परिणाम करणारे ठरणार असून काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार असल्याची नांदी ठरणार आहे.


उंडाळकरांचे जिल्हाभर नेटवर्क


सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून कराड दक्षिणचे 35 वर्षे प्रतिनिधीत्व करणारे जेष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. राजकारणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर विलासकाका हे एकमेव नेते आहेत. त्यांनी जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि जिल्ह्याच्या राजकारणावर आपली एकहाती पकड निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यात मोठे कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. याला साथ पृथ्वीराजबाबांची मिळाल्यास जिल्ह्याच्या राजकारणात नवा उदय दमदारपणे वाटचाल करेल.