कराड सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात सावळागोंधळ

'पै पाहुणे'च ठेकेदार बनल्याने वाढला संशयकल्लोळ

कराड सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात सावळागोंधळ

कराड सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात सावळागोंधळ

पै पाहुणेच ठेकेदार बनल्याने वाढला संशयकल्लोळ

कराड शासकीय सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग गैर कारभारामुळे चर्चेत आला आहे.अधिकाऱ्यांचे 'पै पाहुणे'च ठेकेदार म्हणून कामे मिळवू लागल्याने संशयकल्लोळ पसरला आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये हडप होऊ लागल्याची चर्चा पसरल्याने ठेकेदार गब्बर अधिकारी शिरजोर तर शासकीय कार्यालयांच्या मेंटेनन्सला घरघर लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रसार माध्यमांच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित व अडगळीतील विभाग असल्याने सहजासहजी या विभागाकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी या विभागात जोर धरू लागल्याची चर्चा आहे.काही अभियंते बरीच वर्षे झाली तरी तालुक्यातील मुख्य ठिकाणी बस्तान बसवून आहेत.कधी सांगली तर कधी कराड असा खो खो चा खेळ सुरू असल्याने मर्जीतील लोकांना कामांचा खुराक दिला जात आहे.

तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालये,कोर्ट,शासकीय दवाखाने, शासकीय शाळा,कॉलेज,वसतिगृहे पोलीस ठाणी यांचे बांधकामाचे काम शासनाच्या बांधकाम खात्याच्या सिव्हिल विभागा मार्फत होत असते परंतु या ठिकाणी विद्युत फिटिंगची (लाईट फिटिंग,पंखे,वातानुकूलित यंत्रणा,हिटर,गिझर)यांची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यरत असतो.याची कल्पना अथवा माहिती ही फारच कमी लोकांना असते शासकीय विभागाच्या कोणत्याही कार्यलयाचा मेंटेनन्स हा याच विभागाच्या अखत्यारीत येत असतो आणि यासाठी शासन प्रतिवर्षी ठराविक निधीची तरतूद करत असते.वीज वितरण कंपनीचे काम हे वीज पुरवठा मीटर पेटी पर्यत आणून सोडणे एवढ्यावरच मर्यादित असते यानंतरचा सर्व सोपस्कार हा विद्युत विभाग पार पाडत असतो.

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागाचे देखभाल दुरूस्तीचे वार्षिक बजेट सुमारे ६ ते ८ कोटींची असल्याची चर्चा आहे.यामध्ये नूतनीकरण, नवीन विद्युत फिटिंग तसेच तक्रारी प्रमाणे शासकीय कार्यालयातील देखभाल दुरुस्तीचे कामांचा समावेश यामध्ये आहे.सातारा जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी एका छोट्याश्या कौलारू इमारतीत या विभागाचा कारभार चालत असतो तर कराड येथील कार्यालय सुद्धा ब्रिटिशकालीन असल्याचा भास होतो यामुळे हा विभाग सहजासहजी नजरेत येत नाही.कराड विभागाच्या अंतर्गत कराड,पाटण,माण, खटाव हे तालुके समाविष्ट आहेत.तर सातारा आणि सातारा १ या विभागा मार्फत इतर तालुके जोडले गेले आहेत.पहिल्या भागात या विभागाची छोटीशी ओळख वाचकांना करून देण्याचा दै.प्रीतिसंगमचा प्रयत्न आहे पुढील भागात या विभागाच्या गमतीजमती आणि खाबूगिरी याबाबत सविस्तर मथळा वृत्त मालिकेच्या स्वरूपात उलगडणात आहे.