कराड ही शूर-वीरांची भूमी - लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत

कराडला मोठी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी आहे. या भूमीने अनेक शूर-वीर योद्धे दिले असून ही खर्या अर्थाने शूर-वीरांची भूमी आहे. मी मराठा बटालियनमध्ये कार्यरत असून कराडच्या या पवित्र भूमीत आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शूर-वीरांच्या या पवित्र भूमीला मी आदरपूर्वक सॅल्युट करतो.

कराड ही शूर-वीरांची भूमी - लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत
फोटो : कराड : लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी समाधीस्थळी त्यांच्यासोबत उपस्थित मान्यवर.

कराड ही शूर-वीरांची भूमी - लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत

महाराष्ट्र दर्शन दौऱ्यादरम्यान कराडला भेट : स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ व विजय स्तंभास अभिवादन

कराड/प्रतिनिधी : 

        कराड शहरासह परिसराला मोठी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी आहे. या भूमीने अनेक शूर, वीर योद्धे दिले असून कराड ही खर्या अर्थाने शूर-वीरांची भूमी आहे. मी मराठा बटालियनमध्ये कार्यरत असून या पवित्र भूमीत आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शूर-वीरांच्या या पवित्र भूमीला मी आदरपूर्वक सॅल्युट करतो, असे गौरवोद्गार ७ मराठा लाईफ इन्फट्री बटालियनचे लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांनी काढले.

       दक्षिण आफ्रिकेत ‘कांगो’ याठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या ७ मराठा लाईफ इन्फट्री बटालियनचे लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत सध्या महाराष्ट्र दर्शन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज शुक्रवारी ३१ रोजी कराडला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. 

     यावेळी तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, सुभेदार संजय पाटील, मधूकर गायकवाड, कॅप्टन सुभेदार मेजर विठ्ठल भोसले, हवालदार विकास पडवळ, नायक विजय लोकरे, विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव उपस्थित होते.

     दरम्यान, लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांनी माजी संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर विजय दिवस चौकातील विजय स्मृतीस्तंभावरही त्यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

    यावेळी लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांना विलासराव जाधव यांनी कराडचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि राजकीय महत्व सांगितले. त्याचबरोबर कराडच्या परिसरातील किल्ले वसंतगड, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराबाई, सदाशिवगड, अगाशिव लेणी, कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम आदींविषयीही माहिती दिली.

     त्याचबरोबर कराडमध्ये गेली २३ वर्षे कर्नल संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शिस्तबद्धरित्या सुरू असलेल्या विजय दिवस समारोहाचीही माहिती लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांना देण्यात आली. विजय दिवस समारोहाची माहिती ऐकून लेफ्टनंट राघवेंद्र सिंह प्रभावित झाले. त्यांनी कराडच्या या ऐतिहासिक, पराक्रमी भूमीचे भरभरून कौतुक केले.