उंडाळे, कासारशिरंबे, घोगांव, टाळगाव येथील मुरूम उपसा तेजीत

नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली, कारवाई गुलदस्त्यात

उंडाळे, कासारशिरंबे, घोगांव, टाळगाव येथील मुरूम उपसा तेजीत

उंडाळे, कासारशिरंबे, घोगांव, टाळगाव येथील मुरूम उपसा तेजीत
नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली, कारवाई गुलदस्त्यात


कराड/प्रतिनिधीः-


उंडाळे परिसरातील अवैध मुरूम उपसा बोकाळला असून काही ठिकाणी विनापरवाना मुरूम उत्खनन सुरू असून तक्रारदाराला दमदाटी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे.नाममात्र रॉयल्टी भरून बेफाम मुरूम उपसा करण्याचे सत्र उंडाळे परिसरात धुमधडाक्यात सूर असल्याची चर्चा असून महसूल कर्मचारी फक्त ’कलेक्शन’ साठीच फिरकत असल्याची नागरिकांची कैफियत आहे.तलाठी,सर्कल यांना वरकमाईचा अड्डा म्हणून उंडाळे परीसरातील मुरूम उपसा परिचित असल्याची चर्चा असून याबाबत गोरगरीब जनता तक्रार करण्याचे धाडस करीत नसल्याने महसुलसह ठेकेदारांचे फावले आहे.उंडाळे,कासारशिरंबे,घोगांव, टाळगाव येथील मुरूम उपसा तेजीत असून नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली जाते आणि कारवाई गुलदस्त्यात राहत आहे.


कराड दक्षिण मतदारसंघात उंडाळे परिसर काहीसा डोंगराळ व जिल्हयाचे शेवटचे टोक असल्याने महसूल अधिकार्‍यांचे या विभागावर काहीसे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा असून यामुळे तलाठी,सर्कल,कोतवाल यांना जाब विचारणारे कोणी नसल्याने परिसराचे मालक असल्यासारखे महसूल कर्मचार्‍यांनी सदरचा परिसर अवैध उत्खनन करणार्‍या ठेकेदारांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक महसूल कर्मचारी याठिकाणी नियुक्ती घेऊन मालामाल झाले असल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.काही जागरूक नागरिकांनी तक्रार करावयाचा प्रयत्न केल्यास त्याच्या अंगावर गावटगे सोडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याची नागरिकांची तक्रार असून नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक घटना नागरिकांनी दै.प्रीतिसंगम जवळ व्यक्त केल्या आहेत.


घोगांव येथील गट न 347 मध्ये 200 मुरूम उत्खनन परवाना 15 ते 25 सप्टेंबर 2020 साठी दिला गेला होता.कासार शिरंबे येथील गट नं 1303/9मध्ये मुरूम उपशा साठी 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2020 साठी परवाना दिला गेला होता.टाळगाव येथील गट न 436/435 मध्ये 200 ब्रास मुरूम उत्खनन करण्यासाठी 4 ते 14 सप्टेंबर 2020 दरम्यान परवाना दिला गेला होता. अशा प्रकारे अनेक ठिकाणी नाममात्र परवाने घेऊन बेफाम मुरूम उपसा करण्याचा सपाटा ठेकेदारांनी लावला आहे.काही ठिकाणच्या परवानग्या संपून बराच कालावधी लोटला तरी सुद्धा त्या ठिकानांवरून मुरूम उपसा बेकायदेशीर पणे सुरूच असून ठेकेदारांनी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून वारेमाप मुरूम उपसा करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.
कराड उत्तर मतदार संघापेक्षा कराड दक्षिण मतदार संघात मुरुमाचे अतोनात उत्खनन झाले असून महसूल प्रशासनाची मिलीभगत असल्याशिवाय असे धाडस कोणीही करणार नाही अशी लोकांच्यात चर्चा आहे.उंडाळे सारख्या डोंगराळ परिसरात महसूल अधिकार्‍यांनी जाणूनबुजून कानाडोळा केल्याचा नागरिकांचा आरोप असून महसूल प्रशासनाचे मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी,कोतवाल हे नेमके काय करतात याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह असून ठेकेदारांशी मिलीभगत असल्यानेच डोंगर ’बोडके’करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.


जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे परिसरातील डोंगरांची एकदा पाहणी करावी म्हणजे वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येईल असे उंडाळे परिसरातील जनतेचे मत आहे.जिवाच्या भीतीने कोणताही नागरिक तक्रारीसाठी पुढे येणार नाही परंतु वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांनी एकदा या विभागाला भेटी दिल्यावर त्यांना परिस्थिती ची कल्पना येईल यामुळे निसर्ग साधन संपत्ती वाचवायची असेल तर डोंगर टिकले पाहिजेत असे ग्रामस्थांचे मत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

परवाना 100 ब्रासचा, उपसा अमाप


कराड तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरांच्या नांवे परवाने घेण्यात आले आहेत. या कॉन्ट्रॉक्टरांची चलने खाजगी मुरूम टाकणारे घेतात. तुमचा मुरूम उचलतो आणि जमीन मातीने भरून देतो. अशी आशा शेतकर्‍यांना दाखवली जाते. कॉन्ट्रॅक्टरांच्या नावे 100 ब्रासचा परवाना घ्यायाचा आणि अमाप मुरूम उपसा करायचा. हा गोलमाल गेली अनेक वर्षे तालुक्यात सुरू आहे. याकडे महसूल खाते जाणूनबुजून दुर्लक्ष करते की लागेबांधे आहेत म्हणून दुर्लक्ष करते. याची सखोली चौकशी झाली पाहिजे. शासनाचा बुडलेला महसूल शासनाच्या खात्यात जमा झाला पाहिजे, अशी तालुक्यातील अनेक गावकर्‍यांनी आमच्याकडे मागणी केली आहे.

सर्कल-तलाठ्यांची मिटींग चांगलीच गाजली


कराड तालुक्यातील मुरूम उपशाबाबत महसूलचे गोलमाल ही मालिका दैनिक प्रीतिसंगमने लावून धरली आणि दडलेला काळा बाजार उजेडात आला. प्रत्येकजण आजपर्यंत वाळू उपशा वाल्यांच्या विरोधात मत प्रदर्शित करत होते. पण हा गोलमाल फार मोठा आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर आज तहसिलदार व प्रांताधिकार्‍यांनी सर्कल व तलाठ्यांची बैठक घेतली आणि तलाठी व सर्कलांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यापुढे असे कोठे घडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. खरे आहे... त्यांच्यावर कारवाई होईल... पण आजपर्यंत झाले त्याचे काय... याची चौकशी जिल्हाधिकार्‍यांनी करावी.