उपनगराध्यक्ष जयवंत पाटलांची पृथ्वीराजबाबांच्या निवासस्थानी एन्ट्री

पावणे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच  भेटीलाःराजकीय वर्तुळात चर्चा

उपनगराध्यक्ष जयवंत पाटलांची पृथ्वीराजबाबांच्या निवासस्थानी एन्ट्री

उपनगराध्यक्ष जयवंत पाटलांची पृथ्वीराजबाबांच्या निवासस्थानी एन्ट्री


पावणे पाच बर्षांनंतर पहिल्यांदाच  भेटीलाःराजकीय वर्तुळात चर्चा

कराड/प्रतिनिधीः


कराड नगरपरिषदेच्या गतवेळेच्या निवडणूकीनंतर केवळ चारच दिवसात फारकत घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडून चौथा सुभा मांडण्याचा प्रयत्न सत्तेत आलेल्या जनशक्ती-यशवंत-लोकसेवा आघाडीने केला. तब्बल पावने पाच वर्षाचा कालखंड या आघाडीचे नगरसेवक हे पृथ्वीराज बाबांना सोडून पालिकेचा कारभार करत होते. केवळ दोनच नगरसेवक त्यांच्या बरोबर राहिले. सत्तेत असलेले सध्याचे विद्यमान उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी ऐंन्ट्री केली. ही त्यांची ऐंन्ट्री केवळ कामापुरती होती की भविष्यातील होवू घातलेल्या निवडणूकीची चाहूल दाखवणारी होती . यावर शहरात उलट-सूलट चर्चा रंगू लागल्या आहेत. निमित्त विमानतळाच्या प्रश्नाचे असले तरी त्यांची ऐंन्ट्री मात्र बरेच काही राजकीय गणिते आखणारी आहे.


कराड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना प्रत्यक्षात निवडणूकीला सुरूवात होण्यापूर्वीच अनेकांनी आपआपली राजकीय गणिते मांडावयास सुरूवात केली आहे. सध्या सत्तेत असलेल्या जनशक्ती-यशवंत-लोकसेवा आघाडीत सख्ख नाही. यांच्यातच गट-तट सुरू झाले आहेत. अशातच राजेंद्रसिंह यादव कोणती भूमिका घेणार याकडे शहराचे लक्ष लागले असतानाच पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे कोणाबरोबर जाणार याची गणिते मांडत असतानाच कराड विमानतळाबाबत शासनाने जारी केलेल्या आदेशामुळे साशंकता निर्माण झाली आहे. यावर चर्चा करण्यासाठी क्रिडाई या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्याबरोबर कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी येवून या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये सुमारे तासभर या विषयावर चर्चा झाली मात्र निमित्त विमानताळाच्या प्रश्नाचे असले तरी ऐंन्ट्री मात्र जयवंत पाटलांनी केली.


29 नोव्हेंबर 2016 ला कराड नगरपरिषदेची निवडणूक पार पडली या निवडणूकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जनशक्ती-यशवंत-लोकसेवा आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले मात्र नगराध्यक्षा भाजपाच्या निवडूण आल्या. या निवडणूकीत यशवंत आघाडीचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा पराभव झाला. या पराभवाची कारणविमासा शोधतच या आघाडीतील सर्व नगरसेवकांनी बाबांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजअखेर हे नगरसेवक त्याच्या कार्यालयात अथवा निवासस्थानी गेले नाहीत. असे असताना पालिकेची निवडणूक आता जवळ येवून टेकली आहे. प्रभाग रचनाही जवळपास निश्चित झाल्याची समजते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीने दोन महिन्यापूर्वीच पालिकेची निवडणूक आम्ही आघाडीच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा या आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील व नुतन अध्यक्ष जयंतकाका पाटील  यांनी केली आहे. आणि त्यापद्धतीने त्यांची राजकीय रणनिती सुरू आहे.


लोकशाही आघाडीने घोषणा केली मात्र या निवडणूकीत काँग्रेस नेमकी भूमिका काय घेणार हे अद्याप पृथ्वीराजबाबांनी जाहीर केलेले नाही. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच निमित्त विमानतळाच्या प्रश्नाचे करत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानी ऐंन्ट्री केली. तेथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नसली तरी ते त्या ठिकाणी गेले हे बरेच काही सांगणारे आहे. सध्या जयवंत पाटील आणि राजेंद्रसिंह यादव हे कोणता निर्णय घेणार ते स्वतंत्र लढणार की कोणत्यातरी आघाडीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असतानाच जयवंतदादांची ही ऐंन्ट्री सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

जयवंतदादांनीही आपली भूमिका आजअखेर गुलदस्तातच ठेवली आहे. त्यांनीही उघड राजकीय भूमिका घेतलेली नाही. आगामी निवडणूक पृथ्वीराजबाबा पक्षाच्या चिन्हावर लढणार की पुन्हा आघाडी करून लढणार हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर जनशक्तीचे अध्यक्ष अरूण जाधव यांनीही आपली भूमिका जाहीर केली नसली तरी पृथ्वीराजबाबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत शहरात झळकलेले फ्लेक्स बोर्ड आणि त्या फ्लेक्स बोर्डवर असलेले जनशक्तीचे अध्यक्ष अरूण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, नगरसेवक अतुल शिंदे याचीही चर्चा तेव्हा पासूनच आजअखेर शहरात सुरू आहे. भविष्यात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.